रत्नागिरी :
विधानसभा निवडणुकीआधी आणि नंतर एसीबी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर गुरुवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राज्याचे उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत उपस्थित होते. कोकणचा ढाण्या वाघ पुन्हा एकदा आपल्या गुहेत परतलाय, असे उद्गार यावेळी शिंदेंनी काढले. तर एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहोत, असे महत्त्वपूर्ण विधान उदय सामंत यांनी केले.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राजन साळवी यांनी बुधवारी ठाकरे शिवसेना. उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुरुवारी ठाणे येथील आनंद, दिघे यांच्या आनंदाश्रमात त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करताना आज आपल्या एका डोळ्यात दुःखाश्रु तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रु असल्याची भावना साळवी यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, शिंदे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या शिवसेनेत जाऊ शकलो नाही. ती त्यावेळची परिस्थिती असेल. शिवाय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात परिवर्तन पहायला मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि आपण मंत्री होईन, असेवाटले होते. पण नियतीच्या मनात वेगळे काहीतरी होते. आता शिंदेंनी मला त्यांच्या पक्षात सामावून घेतलं, हा आनंदाचा क्षण आहे. मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळालं आहे. मलाकाही नको. मी अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. माझी फक्त एकच अपेक्षा आहे की, माझ्याबरोबर आलेले राजापूर-लांजा मतदारसंघातील सर्व मतदार, माझे शिवसैनिक, पदाधिकारी यांना योग्यतो मान सन्मान मिळावा. योग्य त्या अनुषंगाने त्यांना जे काही देता येईल ते द्यावे. माझ्यापेक्षा माझ्या पदाधिकाऱ्यांना सांभाळावे, अशी अपेक्षा साळवींनी शिदेंकडे व्यक्त केली. साळवी यांच्यासमवेत लांजा-राजापूर-साखरपा मतदार संघातील शिवसेनेचे अनेक विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.








