संकेश्वर : संकेश्वर येथील हेद्दुरशट्टी घराण्यातील नवसाचा राजा निलगारचे सोमवार दि. 15 रोजी रात्री येथील हिरण्यकेशी नदीत 20 व्या दिवशी विसर्जन होणार आहे. गत 20 दिवसांपासून सुमारे 5 लाख भाविकांनी निलगार गणेशच्या दर्शनाचा लाभ घेतला. यामुळे संकेश्वर शहराला 20 दिवस यात्रेचे स्वरुप आले आहे. 20 दिवसांच्या काळात कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. 27 ऑगस्ट रोजी निलगारचे आगमन झाले. हेद्दुरशट्टी घराण्यात राजा निलगारची पारंपरिक विधीने प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यास सुरुवात केली. तब्बल 20 दिवस दर्शनासाठी सुमारे 2 किलोमीटर अंतरावरून रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला.
प्रतिवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. गांधी चौक, नवी गल्ली, कुंभार गल्ली, करशट्टी गल्ली या गल्लीतून मिळेल त्या वाटेने भाविक दर्शन घेण्यासाठी मोठी कसरत करताना दिसत होते. यंदा नवसाची परतफेड करण्यासाठी व श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लांब पल्ल्यावरून भाविक दर्शनासाठी येत आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. भाविकांची संख्या वाढत असून सुमारे 2 कि. मी. पर्यंत रांग लागत आहे. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस सलग सुट्या असल्यामुळे भाविकांच्या संख्येत अधिकच वाढ दिसून येत आहे. यंदा मिठाई, स्टेशनरी अशा विविध स्टॉलसह पाळणे अशा मनोरंजनाचे स्टॉलही मांडण्यात आल्यामुळे भाविकांना दर्शनासह मनोरंजनाचा लाभही घेता आला.









