ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. (Raj Thackeray’s visit to Ayodhya postponed)
राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यावर शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे बुधवारी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतले होते. पुण्यात शनिवारी होणारी सभाही त्यांनी रद्द केली होती. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन राज ठाकरे रविवारी पुण्यात अयोध्या दौऱ्याबाबत पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. राज ठाकरे यांनी यासंदर्भात सकाळी एक ट्विटही केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच….. रविवार, 22 मे. सकाळी 10 वाजता. स्थळ : गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे.”
राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आला होता.