मुंबई : गुढी पाडवा व दोन दिवसापूर्वी ठाणे उत्तर मध्ये झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर चांगलीच आगपाखड केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत त्याचा कामगिरी बाबत अनेक टोले लगावले आहेत. राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे शिवसैनिक दुखावले गेले असून त्यांच्यात संतापाची लाट आहे. त्यांच्या या टीकेला आता शिवसैनिकांनी जोरदार उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल आरोप करत त्यांनी शिवसेना (shivsena) भवनासमोर पोस्टर लावून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला जाऊ शकतो.
शिवसैनिकांची पुन्हा पोस्टरबाजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर संतापलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना भवनासमोर एक पोस्टर लावले आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुस्लिम वेषांतर केला असलेला फोटो टाकण्यात आला आहे. त्यासमोर काल, आज आणि उद्या असं म्हणत मनसेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. तसंच मध्यभागी ‘हनुमान’ असे लिहले आहे. शेवटी प्रश्नचिन्ह देत उद्या पुन्हा भूमिका बदलणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही जवळ आली आहे. त्यामुळे शहरात शिवसेना आणि मनसे विविध मुद्द्यांवरून आमने-सामने येण्याची शक्यता असून यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.