Raj Thackeray Visit In Kolhapur: संजीव खाडे, कोल्हापूर
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.त्याचवेळी राजू दिंडोर्ले,अभिजित साळोखे,अभिजित राऊत,रणजित वरेकर,प्रसाद पाटील यांनी कोल्हापुरात मनसेची पहिली शाखा संभाजीनगरात सुरू केली.त्यानंतर (कै.)उदय पोवार,नवेज मुल्ला,दौलत पाटील, नागेश चौगले यांच्यासह राजू जाधव,विजय करजगार,संजय करजगार,प्रसाद पाटील आदी मनसैनिक काँग्रेस,राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात गेली सोळा वर्षे आपल्या पक्षासाठी लढत आहेत.विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहेत.पण अपेक्षेप्रमाणे मनसेची वाढ होऊ शकली नाही.आता दीडदशकानंतर या पक्षाला संघटनात्मक बांधणीबरोबर पक्ष नेतृत्वाच्या पाठबळाची असलेली गरज आजही आहे.आज मंगळवारी (दि. 29 नोव्हेंबर)मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना मनसैनिक पाठबळाची अपेक्षा करत आहेत.
ठाकरे घराण्याचे आणि कोल्हापूरचे नाते संस्थानकाळापासून आहे.राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा स्नेह सारा महाराष्ट्र जाणतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर आपल्या प्रत्येक दौऱ्याची, राजकीय सभांची सुरूवात करवीर निवासिनी अंबाबाईला नारळ फोडून केली होती.त्यांच्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ही परंपरा कायम ठेवली.राज ठाकरेंचे कोल्हापूरशी ठाकरे म्हणून वेगळे नाते आहे.कारण ठाकरेंवर प्रेम करणारे म्हणूनही कोल्हापूरची ओळख आहे.मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई,पुणे,ठाणे,नाशिक या ठिकाणीच ताकद वाढविण्यासाठी भर दिला.त्या तुलनेत त्यांचे कोल्हापूरकडे काहीसे दुर्लक्ष झाले.तरीही त्यांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा कोल्हापुरी मनसैनिक आजही लढताना दिसत आहे.
काँग्रेस,राष्ट्रवादी,भाजप,दोन्ही शिवसेना (ठाकरे,शिंदे) यांच्या स्पर्धेत आणि तुलनेत कोल्हापूर जिल्ह्य़ात मनसेची ताकद फारशी नसली तरी संख्येने मर्यादीत असणाऱ्या मनसैनिकांनी जपलेला कट्टरपणा,पक्षाच्या अस्तित्वासाठी सुरू ठेवलेली धडपड उल्लेखनीय आहे.त्यातून त्यांचे राज ठाकरेंवरील प्रेमही दिसते.या मनसैनिकाला ठाकरे यांनी वेळोवेळी बळ दिले असते.राजकीय ताकद दिली असती,कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर मनसेची म्हणून जर भूमिका घेतली असती,तर पक्षवाढीला बळ मिळाले असते.पण त्याकडे ठाकरे यांचे दुर्लक्ष झाल्याने मनसेचा कोल्हापूर जिल्ह्य़ातील अवकाश मर्यादित राहिला.
गेल्या सोळा वर्षात 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता मनसेने निवडणुकीत सहभाग घेतला नाही.त्याचा फटका पक्षवाढीवर आणि संघटनात्मक ताकदवाढीवर झाला.निवडणूक कार्यकर्त्यांसाठी बुस्ट असतो.पण ती न लढल्याने मनसेची जिल्ह्य़ातील ताकद मर्यादित राहिली.राज ठाकरे यांच्या करिश्मा आणि वलयाच्या जोरावर जिल्ह्य़ात मनसैनिक लढत आहेत.जनहिताचे लहान,मोठे प्रश्न घेऊन व्यवस्थेला जाब विचारत आहेत.पण त्यांच्या आंदोलनातून राजकीय ताकद निर्माण झालेली नाही,हे वास्तव आहे.2014 च्या विधानसभा निवडणुकीत दहा मतदार संघात मनसे लढली,पण सर्व उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाली.त्यानंतर गेल्या सात आठ वर्षांत मनसे निवडणुकीपासून दूर राहिली आहे. 2015 च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे राजू दिंर्डोले अपक्ष लढून नगरसेवक झाले.हा एकमेव अपवाद वगळता मनसेचा लोकप्रतिनिधी होऊ शकला नाही.आता आगामी काळात महापालिकेसह इतर निवडणुका आहेत.यामध्ये मनसेची भूमिका लढण्याची असेल तर त्यासाठी मनसैनिक सज्ज असेल त्यांना राजकीय पाठबळ लागणार आहे.ते देण्याची जबाबदारी पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांची आहे.त्यांनी महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे कोल्हापूरच्या प्रश्न आणि भविष्यासंदर्भात ब्ल्यू प्रिंटरूपी कार्यक्रम दिला,भूमिका घेतली तर पक्ष वाढीला बळ मिळू शकते.कृष्णपुंज मधून हे बळ मिळणार काय?, याची प्रतिक्षा मनसैनिकाला आहे.
बिंदू चौकातील सभा,गांधी मैदानातील विराट सभा
शिवसेनेत असताना राज ठाकरे यांची पहिली सभा 1999 मध्ये ऐतिहासिक बिंदू चौकात झाली होती.त्यानंतर मनसे अध्यक्ष म्हणून त्यांनी 2012 मध्ये गांधी मैदानात लाखाची विराट सभा घेतली होती.बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे यांच्याच गांधी मैदानातील सभेला लाखाहून अधिक लोक उपस्थित होते.
Previous Articleएडीजीपी अलोककुमार बेळगावात दाखल
Next Article चोरटय़ांकडून ग्रामीण भागातील मंदिरे लक्ष्य









