ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून, मुंबई, ठाणे आणि औरंगाबादेतील सभेप्रमाणेच पुण्यातील आजची सभाही वादळी होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित केला. त्यामागचं नेमकं कारण आणि पुढची दिशा आजच्या सभेत ठरण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्यापासून भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. मुंबईत उत्तरभारतीयांवर अत्याचार करणाऱ्या राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे. तर दुसरीकडेच काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याने बीकेसीतील सभेत राज ठाकरेंना सिनेमातल्या मुन्नाभाईची उपमा देत खिल्ली उडवली होती. काही जणांना बाळासाहेब झाल्यासारखे वाटत आहे. ते कधी हिंदुत्वाचा मुद्दा घेतात तर कधी मराठीचा असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं होतं.
मुंबईतील उत्तरसभा आणि औरंगाबादेतील सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला होता. तेव्हापासून राजकीय घडमोडींना वेग आला होता. त्यामुळे या सर्व मुद्यांवरुन राज ठाकरेंची तोफ आज कोणावर धडाडणार, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.