ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर माझ्या दौऱ्याला उत्तरप्रदेशातील कोणीतरी खासदार उठतो आणि विरोध करतो, हे कसं शक्य आहे. नंतर माझ्या लक्षात आलं हा सर्व ट्रप आहे. ज्यांना माझा अयोध्या दौरा खुपत होता, त्यांनीच हा ट्रप रचला. हे सगळं राजकारण असून, त्यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली गेली, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोधकांवर केला.
पुण्यातील आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, माझा अयोध्या दौरा जाहीर झाल्यानंतर उत्तरप्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनी माझ्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. मागील 13 वर्ष हे झोपले होते का, आताच त्यांना विरोध का करायचा होता. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशमधून मला माहिती मिळत होती. त्यानंतर मला लक्षात आलं हा टॅप आहे. या सर्व गोष्टींची सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा असं सांगितलं गेलं. ज्यांना माझी अयोध्या वारी खुपत होती, त्यांनी हा डाव आखला. राम जन्मभुमीचं दर्शन मला घ्यायचं होतं, मात्र त्यासोबत कारसेवकांचे मृत्यू ज्याठिकाणी झाले होते, तिथे देखील भेट द्यायची होती. जर मी जाण्याचा हट्ट धरला असता, अन् तिथे जर काही झालं असतं, तर मनसैनिकांवर केसेस टाकल्या असत्या, तुम्हाला तुरुंगात टाकलं गेलं असतं. मात्र, मला आपली पोरं हाकनाक वाया घालवायची नव्हती.
हिंदुत्वावरुन मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधला. आमचं हिंदुत्व खरं की खोटं सुरु आहे. हे काय वॉशिंग पॉवडर विकत आहेत का? असा मिश्किल सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. तसंच आमच्या हिंदुत्वाचा इफेक्ट लोकांना दिसतो असं राज ठाकरे म्हणाले. इथे मुंबईत पाकिस्तानी कलाकार येत होते, तेव्हा आम्ही त्यांना हाकललं. शिवसेनेला एवढीही अक्कल नाही की ती कोणाबरोबर राहत आहे, ती सत्तेत मश्गुल आहे. महाविकास आघाडी सरकार पाहिलं तर बाळासाहेबांना आनंद होईल असं शिवसेना नेते म्हणत आहेत. पण शिवसेना या सर्व गोष्टींमुळे बाळासाहेबांची पेडीबीलीटी घालवत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.