Raj Thackeray : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भेट घेतली.यावेळी त्यांचे प्रश्न, मागण्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन चर्चा करेन, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं.निष्ठुर राजकारण्यांना जाग येईल तेव्हा येईल पण तुम्ही जीव धोक्यात घालू नका, असे आव्हानही त्यांनी यावेळी केलं. मनोज जरांडे यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे आणि अमित ठाकरे आज आंतरवाली सराटी येथे गेले, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्याविरोधात आवाज उठवा.राजकारण्यांच्या नादाला न लागण्याचा सल्ला यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना केला.पोलीसांना दोष देऊ नका, आदेश देणारे दोषी आहेत.पोलीस काय करणार जे त्यांना वरून सांगितलं तो त्यांनी पाळलं.तुमचा फक्त मतांसाठी उपयोग होतोय.मला नेत्यांसारख खोट बोलता येत नाही.मोर्चे निघाले तेव्हाच मी म्हणालो होतो, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. हे सगळे राजकारणी मतासाठी तुमचा वापर करून घेतील आणि नंतर दुर्लक्ष करून घेतील. मराठा आरक्षण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घ्या, असेही राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समुद्रात उभा करायचा आहे हे मी तुम्हाला बोललो होतो. या पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडून सगळ्यांनी मत मागितली गेली.समुद्रात जाऊन फुले टाकली. पण समुद्रात पुतळा उभा करणं हे अशक्य आहे. महाराजांचे गडकिल्ले हे खरे स्मारक आहेत.हे गडकिल्ले सुधारले पाहिजेत. राजा कोण होऊन गेला ते येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना दाखवलं पाहिजे.मात्र मतांसाठी सतत आरक्षणाचा मुद्दा पुढं आणला जातो. मत मिळाल्यावर तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जात. ज्या लोकांनी लाठीचार्ज करायला सांगितलं त्यांना मराठवाड्यात बंदी करा.त्यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांनी इथं येऊ नये. मात्र लवकरच मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, मला या नेत्यांसारखं खोटं बोलता येत नाही.फडणवीस म्हणाले याचं राजकारण करू नका. मात्र ते विरोधात असते तर काय केलं असतं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.