ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दसरा मेळाव्याच्या राजकारणात पडू नये, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला होता. पण मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता शिवसेनेला हायकोर्टाने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाची नाचक्की झाली. राज ठाकरेंचा सल्ला किती योग्य होता, हे मुख्यमंत्र्यांच्या आता लक्षात आलं असेल, असा खुलासा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाजन म्हणाले, मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचंही म्हणणं होतं मनसेने दसरा मेळावा घ्यावा. पण शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे घट्ट समीकरण आहे. यामध्ये आपण पडू नये, ते कोतेपणाचं होईल, असे सांगत राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला स्पष्ट नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली, त्यावेळीही राज ठाकरे यांनी शिंदेंना दसरा मेळाव्याच्या वादात पडू नये, असा सल्ला दिला होता. पण त्याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं.
अधिक वाचा : मुकेश अंबानी-एकनाथ शिंदेंची ‘वर्षा’वर भेट; रात्री उशिरा बंद दाराआड चर्चा
राजकारण करावे, मतभेद नक्की असतील पण एखाद्याची परंपरा वर्षांनुवर्ष सुरू असेल, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आला आहे. अशा ठिकाणी आपण राजकारण आणू नये, असं राज ठाकरे यांचं म्हणणं होतं, पण ते मुख्यमंत्र्यांनी ते ऐकलं नाही. शेवटी हायकोर्टाने शिवसेनेलाच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाची गोची झाली, असे महाजन म्हणाले.