उद्धव यांच्यासोबत पावणे तीन तास चर्चा
मुंबई
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मनसे आणि ठाकरेच्या शिवसेना पक्षात युतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा असलेल्या ठाकरे बंधूंमध्ये सौहार्द आणि जवळीक सातत्याने वाढत असल्याने आता थेट युतीच्या शक्यतांवर विचारमंथन सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यातच रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री‘ निवासस्थानी पोहोचले. कौटुंबिक स्नेहभोजनासाठी ही भेट असल्याचे बोलले जात असून, उद्धव आणि राज ठाकरे या दोन बंधूंमध्ये तब्बल पावणे तीन तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहेत. मराठीच्या मुद्यावरून हे दोन बंधू एकाच मंचावर आले होते. त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. तर 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या गणेशोत्सवाला शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली होती. यानंतर 10 सप्टेंबरला गणेश मुहूर्तावर आणि 5 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले होते. त्यानंतर आज रविवार 12 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी पोहोचले. त्यामुळे आजची भेट ही दोन्ही भावांची सहावी भेट आहे.
मातोश्रीवर आज राज ठाकरे , शर्मिला ठाकरे, राज ठाकरेंच्या आई, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे हे सहकुटुंब दुपारच्या सुमारास मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी कुटुंबीयांसह त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्रित स्नेहभोजन केल्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, ही चर्चा नेमक्या कोणत्या मुद्यावर झाली हे अद्याप समोर आलेले नाही. यानंतर राज ठाकरे हे सहकुटुंब ‘मातोश्री‘वरून ‘शिवतीर्थ‘च्या दिशेने रवाना झाले.
आज ठाण्यात सेना मनसे एकत्र मोर्चा
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची मनसे पहिल्यांदा एकत्र येत असून, ठाणे पालिकेवर दोघांच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.









