सातारा :
कोण काय म्हणतंय, काखा खंगळलेले पाणी प्रयागराजला गंगा नदीत असते. त्यांचे ते विधानच चुकीचे असून प्रयागराजला महाकुंभमेळाव्यावेळी निर्मळ असेच गंगेचे पाणी होते, असा दावा करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावरुन खरपूस समाचार घेतला. दरम्यान, त्यांनी बौद्धगया येथील विहाराची जागा ही बौद्ध समाजाच्या ताब्यात दिली पाहिजे, असेही त्यांनी निक्षून सांगितले. त्याचबरोबर मंत्री नितेश राणे यांच्या विधानावरुन सडेतोड बोलत मी त्यांच्या विधानाशी असमर्थ आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजानबाबत घेतलेली भूमिका योग्य असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.
साताऱ्याच्या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आले होते. तेव्हा ते शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी रिपाई एचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड, अण्णा वायदंडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, बौद्ध गया येथे सुरु असलेले बौद्ध बांधवाच्या आंदोलनाबाबत तिथल्या त्या प्रशासनाने विचार करुन ती जागा बौद्ध समाज बांधवाना दिली गेली पाहिजे. बौद्ध विहाराचीच ती जागा आहे, असे मत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावेळी उत्तर देताना मांडले. दरम्यान, मंत्री नितेश राणे यांच्याबाबत पत्रकारांनी छेडलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, त्या काळात मीही जन्माला आलो नव्हतो आणि नितेशही जन्माला आले नव्हते. आम्ही दोघेही नव्हतो. इतिहास हा इतिहास आहे. अनेक मुस्लिम शुर होते. मंत्री नितेश राणे यांच्या मताशी मी सहमत नाही, असे त्यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अजानच्या मुद्यावर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जे स्टेटमेंट केलेले आहे. त्यांची अजानबाबत त्यांची चांगली भूमिका आहे. पुर्वीच्या काळात घड्याळं नव्हती. तेव्हापासून ही अजानची प्रथा आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाकुंभ मेळ्यात प्रयागराजच्या गंगेच्या तिर्थाबाबत कोणाला काय वाटत असेल, भक्त काखा बिखा खंगळतात, अंघोळ करतात, असे म्हणत असतील तर ते त्यांचे मत असू शकते. परंतु प्रयागराजच्या गंगेचे पाणी निर्मळच आहे, असे उत्तर त्यांनी देवून मनसेच प्रमुख राज ठाकरे यांना सणसणीत चपराक लगावले.
- स्वारगेट प्रकरणाचा निकाल सहा महिन्यात लागला पाहिजे
स्वारगेट प्रकरणाबाबत काही पत्रकारांनी प्रश्न छेडला असता ते म्हणाले, अलिकडे नीतिमत्ता बिघडत चालली आहे. वासनाकांडासारखे प्रकार घडत आहेत. दिल्ली निर्भयावेळी पार्लमेंटमध्ये कायदा केला. तरीही घटना घडत आहेत. स्वारगेटची घटना गंभीर आहे. त्यातला संशयित हा शिरुर तालुक्यातील आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने लक्ष दिले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना वळण लावले पाहिजे. जो प्रकार घडला तो योग्य नव्हता. स्वारगेट प्रकरणाचा निकाल सहा महिन्याच्या आत लागला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.








