ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मराठा मुक्तीसंग्राम लढय़ाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने मराठवाडय़ात मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या शैलीतून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. रझाकारांना धडा शिकवलात, आता सजाकारांनाही शिक्षा द्या, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाडय़ात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.
https://x.com/RajThackeray/status/1703261940586586615?s=20
पण हे करताना फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाडय़ात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाडय़ाचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि ह्यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुस्रऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणायांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं ह्याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल तर मराठवाडय़ातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे.
तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता ह्याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे. मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या.
पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या मराठवाडय़ातील जनतेला शुभेच्छा.”