ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यासह सभा आयोजकांवर औरंगाबादेतील सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबादेतील सभेपूर्वी पोलिसांनी राज ठाकरेंसह आयोजकांना 16 अटी शर्थीचं पालन करण्यास सांगितलं होतं. त्यामधील 12 अटींचं उल्लंघन केल्याने राज ठाकरेंसह सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. या सभेला औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. सभेपूर्वी 16 अटी घातल्या होत्या या अटी किंवा नियमांचं पालन झालं नाही तर पोलीस कारवाई करतील, असा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, रविवारी झालेल्या या सभेनंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. सभेत आवाजाची मर्यादा ओलांडण्यात आली होती. गर्दीचा नियमही मोडण्यात आला. भडखाऊ भाषण आणि वैयक्तिक टीका टिपण्णीही करण्यात आली. त्यामुळे सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं कशाचं उल्लंघन झालं, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. सभेत 16 अटींपैकी 12 अटींचं उल्लंघन करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात आला. त्यानंतर राज ठाकरेंसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.