मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बंधू भेटीचा ऐतिहासिक क्षण : मनस्वी आनंद झाल्याची भावना व्यक्त
प्रतिनिधी/ मुंबई
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त रविवारी एक ऐतिहासिक क्षण घडला. तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येत भाऊ उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही भेट केवळ वैयक्तिक नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसाठीही एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
राज ठाकरे रविवारी दुपारी मातोश्रीवर पोहोचले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी आमदार वैभव नाईक यांचीही उपस्थिती होती. सुमारे 20 मिनिटे दोन्ही बंधूंमध्ये स्नेहपूर्ण चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभे राहून त्यांनी एकत्र फोटोही काढला. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला खूप आनंद झाला आहे.’ शिवसैनिकांमध्येही या भेटीमुळे एक उत्साही लहर पसरली असून अनेकांनी ही भावनिक घडी ‘शिवसेनेच्या पुनऊज्जीवनाची नांदी’मानली आहे.
दुराव्याची किनार मिटेल काय?
2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या नव्हत्या. मात्र, यावर्षी 5 जुलै रोजी मराठी विजयी मेळाव्यात दोघे एका मंचावर आले आणि आता पुन्हा वाढदिवसानिमित्त भेट, ही ठाकरे बंधुंच्या नात्याचा नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता बळकट करते. ही भेट राजकीयदृष्ट्या देखील खूप महत्त्वाची मानली जात आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील ही वाढती जवळीक येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संभाव्य युतीची संकेत देत आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा, बाळासाहेबांचा वारसा आणि सत्तेच्या समीकरणांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा परिणाम मोठ्या राजकीय उलथापालथी घडवू शकतो. या घटनेमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही नवा उत्साह संचारला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न असलेली शिवसेना पुन्हा एकत्र येईल, अशी आशा शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक व्यक्त करत आहेत. ठाकरे बंधूंची वाढती भेटी, एकमेकांबद्दलचा आदर आणि वाढलेली
संवादाची पातळी पाहता आगामी काळात महाराष्ट्रात मोठं राजकीय चित्र दिसू शकतं. स्थानिक निवडणुकांमध्ये ही एकजूट प्रत्यक्षात येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील अंतर कमी होताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने युतीबाबत अजून काही ठरले नाही, असे सांगितले जात असले तरी राजकीय अर्थ काही लपून राहिला नाही. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर केलेल्या पोस्टवऊन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटले की, ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या..’राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षनावाचा उल्लेख न करता थेट शिवसेना असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना ’शिवसेना पक्षप्रमुख‘ म्हटले आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची याची अधिकृत घोषणाच राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवशी कऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट दिल्याचे मानले जात आहे.









