पुणे / प्रतिनिधी
नियोजित आयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर प्रथमच आपली भुमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत शिवसेनेवर व महाविकास आघाडीवर टिकेची झोड उठवली. निव्वळ राजकारणासाठी शिवसेनेने औरंगाबादच्या नामकरणाचा विषय रेंगाळत ठेवला आहे. शिवसेनेने हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुविकरणासाठी एमआयएमला मोठं केलं आहे. पण सेनेचे दुर्दैव हे की तिथे शिवसेनेच्या खासदाराचा पराभव झाला. एमआयएमचा खासदार निवडून आला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळेच निजामाच्या औलादी आता महाराष्ट्रात वळवळ करायला लागली आहे, असा घणाघात राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला.
राज ठाकरे म्हणाले की, “मला रामजन्मभूमीच दर्शन घ्यायचं होतच, पण त्याबरोबर जिथं कारसेवक मारले गेले त्याचंही मला दर्शन घ्यायच होतं. पण एक कोणीतरी खासदार उठतो आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. मात्र हा सगळा ट्रॅप होता हे लक्षात आल्यानेच मला दौरा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. उत्तरप्रदेशात मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असते. त्यामुळे मला मनसैनिकांना अडकवायचं न्हवतं. त्यामुळेच हा दौरा स्थगित करावा लागला” असं ते म्हणाले.
“ज्यांना हिंदुत्व झोंबले तसेच ज्यांना लाऊडस्पीकर झोंबले. आज सगळे मनसेविरोधात एकत्र आले आहेत. राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा वाचण्याचा हट्ट केला. पण त्यांची अवस्था मधु इथे अन् चंद्र तिथे, अशी झाली. शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांनी एकमेकांवर किती आरोप केले तरीही लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र जेवतानाचे फोटो व्हायरल झाले. यावरून हे सिद्ध होतय की यांचं हिंदुत्व खोटं असून हे सगळे ढोंगी आहेत, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
मनसेच्या आंदोलनावर टिका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातील ६४ टोलनाके बंद झाले. हिंदुत्वाबद्दल बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरची एका तरी आंदोलनची केस दाखवावी. असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे य़ांना दिले. निव्वळ राजकारणासाठी शिवसेनेने औरंगाबादच्या नामकरणाचा विषय़ रेंगाळत ठेवला आहे असे म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले की, त्यांनीच आता औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असं करावं.