महाराष्ट्र जिंकलाच त्यानंतर राजधानी दिल्ली पण जिंकली आता आर्थिक राजधानी मुंबई हे भाजपचे मिशन आहे. मुंबईत कोणतीही निवडणूक जिंकायची असेल तर एक तरी ठाकरे सोबत पाहिजे, त्याच अनुषंगाने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी वरळीमध्ये पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कुणाचाच विश्वास बसू शकत नाही, राज्यात अनेक ठिकाणी समोर आलेले आकडे हे न पटणारे आहेत असे राज ठाकरे म्हणाले होते. राज यांच्या या शंकेने भाजपविरोधी पक्षाला आयतेच बळ मिळाले. त्यानंतर अचानक राज ठाकरे यांची फडणवीस यांनी घेतलेली भेट ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर म्हणजेच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावऊन पायऊतार झाल्यानंतर, राज ठाकरे आणि महायुतीतील नेते यांच्यातील जवळीक वाढली होती. राज ठाकरे हे कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कधी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी तर शिवाजीपार्कच्या दीपोत्सवाला आले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर विशेषत: माहिम विधानसभा निवडणुकीतील राजकारणामुळे हे संबंध काहीसे बिघडल्याचे दिसले.
आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सोमवारी अचानक भेट दिली. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतफत्वाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीतील काही उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या, ज्यामुळे मनसे-भाजपमध्ये किमान विधानसभा निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे संकेत दिले, तर महायुतीने देखील शिवडी विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार बाळा नांदगांवकर यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. तरीही राज ठाकरे यांच्या मनसेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही, इतकेच काय माहिम विधानसभा मतदार संघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा झालेला पराभव हा राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.
विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत निवडणूकपूर्व युती केली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते, असे थेट राज ठाकरे यांना सांगितले. मनसेचा प्रभाव असणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरात मराठी मतदार आहे. हा मराठी मतदार नेहमीच कोणत्या ना कोणत्या ठाकरे या आडनावाला मानणारा आहे. मुंबईत अजुनही शिवसेना शिंदे गटाला म्हणावे तसे पाय रोवता आलेले नाहीत. शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद मुंबईत जास्त असल्याचे उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच मुंबईतील शिक्षक, पदवीधर तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दाखवून दिले आहे.
भाजपला मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. मनसेचे एक वैशिष्ट्या म्हणजे मनसेने आजपर्यंत सगळ्या निवडणूका या स्वबळावर लढवल्या आहेत, मनसेने आजपर्यत कोणाबरोबरच निवडणूकपूर्व युती केलेली नाही. पण मनसेच्या याच भूमिकेचा सगळ्यात जास्त फटका मनसेला आत्तापर्यंत बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फडणवीस आणि राज यांच्या भेटीनंतर मनसे आणि भाजप यांच्यात आगामी मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांसाठी युतीची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपसोबत युती केल्यास राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची संधी मिळू शकते. अमित ठाकरे यांनी माहिम विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली, यावेळी अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवडीत एकीकडे बाळा नांदगांवकर यांच्या विरोधात महायुतीने (शिवसेनेने) उमेदवार दिला नव्हता, त्यातच माहिम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या घोषित केलेल्या उमेदवाराला ऐनवेळी उमेदवारी मागे घेण्यास सांगणे म्हणजे, एकीकडे बाळासाहेबांची शिवसेना म्हणायचे आणि याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाणाचा उमेदवार नसणे, असे सांगत सरवणकर यांची उमेदवारी मागे घेण्यास शिवसेनेने नकार दिला होता तर भाजप मात्र सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी या मताचे होते. मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाला विशेष महत्त्व आहे.
2017 ला झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढली होती, त्यात शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. भाजपने मनात आणले तर शिवसेनेची महापालिकेतील अनेक वर्षाची सत्ता भाजपने 2017 लाच उलथवुन टाकली असती. भाजपने त्यावेळी विरोधीपक्षात राहुन चौकीदाराची भूमिका बजावण्याची भूमिका घेतली. त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणूक असो किंवा परवा झालेल्या देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणूक असो, भाजपला मिळालेले यश बघता मुंबई महापालिकेत भाजपला स्वबळावर सत्ता आणणे अवघड नाही.
उध्दव ठाकरे यांची महाराष्ट्रातील सत्ता घालवून उध्दव ठाकरेंशिवाय भाजपने राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आणली, आता महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या सत्तेला आव्हान देऊन तेथे राज ठाकरे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे मनसुबे असू शकतात. उध्दव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर यांच्या सर्व विरोधकांना जिवंत ठेवण्याचे काम भाजपने केले. राज ठाकरे-राणे-राणावत आणि राणा यापैकी नितेश राणे हे आज राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. कंगना राणावत या खासदार झाल्या, नवनीत राणा जरी हरल्या असल्या तरी रवी राणा आमदार झाले. आता या सगळ्यात राज ठाकरे यांना काहीतरी देण्याची संधी भाजपला आली असून, आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार का? आणि राज ठाकरे पहिल्यांदा निवडणूकपूर्व युती करणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे








