महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा प्रादेशिक पक्षांचे पुनरागमन होण्याचे संकेत?
By : प्रवीण कळे
मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीत एकत्र वाढलेले राज आणि उध्दव ठाकरे हे मेळाव्यासाठी तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र येणे हे केवळ कुटुंबियांचे पुनर्मिलन नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या शक्यतेचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा प्रादेशिक पक्षांचे पुनरागमन होण्याचे ते संकेत आहेत.
2014 ला नरेंद्र मोदींचा देशाच्या राजकारणातील उदयानंतर प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांचे राजकारण हे भाजपच्या कलेने होऊ लागले. राज्याच्या राजकारणात रहायचे तर आमच्यासोबत अन्यथा, आमच्याशिवाय म्हटलात तर काही खैर नाही.
महाराष्ट्रातही 2014 पासून भाजप या राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव राहिला. हा प्रभाव इतका राहिला की महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांची चार शकले झाली. राष्ट्रीय पक्षांनी राज्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली असली तरी, त्यांना स्थानिक प्रश्नांशी नेहमीच तडजोड करावी लागते. आणि इथेच प्रादेशिक पक्षांना संधी असते.
शनिवारी झालेल्या मेळाव्यात ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे प्रादेशिक राजकारणासाठी पुन्हा एकदा पायाभरणी करण्याचे संकेत आहेत. या मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे म्हटले आहे, तर राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत तसे काही स्पष्ट भाष्य केलेले नाही.
उध्दव ठाकरे यांचे भाषण पाहिले तर त्यांनी राजकीय विषयावर बोलताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचेच जणू रणशिंग फुकल्याचे दिसते. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस ते एकनाथ शिंदे या सगळ्यांवर उध्दव ठाकरे यांनी टीका केली. मात्र राज यांनी हिंदी सक्ती करतानाच भविष्यात मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव तसेच भाषावार प्रांतरचना, त्रिभाषा सूत्र, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा उल्लेख आणि भाजपच्या नेत्यांनी कोणाची मुले कोणत्या शाळेत शिकली ही केलेली टीका यावर राज यांनी प्रत्युत्तर देताना टीका करणाऱ्यांची चांगलीच पिसे काढली.
आता या मेळाव्यानंतर जर ठाकरे बंधू एकत्र आलेच तर महाराष्ट्रातील राजकारण बदलणार हे नक्की. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई, ठाणे आणि महत्त्वाच्या महापालिका निवडणुका एकत्र लढल्यास त्याचा सगळ्यात मोठा फटका शिवसेना शिंदे गटाला बसणार आहे. यापुढचे शिंदे शिवसेनेचे राजकारण हे भाजपवर अवलंबून राहणार आहे. शिंदे शिवसेना, मनसे आणि शिवसेना ठाकरे युती वेगळे लढल्यास मराठी मतांचे विभाजन होणार आहे.
भाजप एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र लढवू शकते आणि इथेच शिंदे यांच्या शिवसेनेची खरी ताकद दिसणार आहे, जी देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दाखवायची आहे. शिंदे शिवसेना लोकसभा आणि विधानसभा भाजपसोबत महायुतीत लढली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या ताकदीचा अजून अंदाज आलेला नाही. दुसरीकडे अमराठी मतदार हा भाजपच्या बाजूने जाणार हे अस्पष्ट आहे.
त्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या स्पर्धेत भाजप हा महाराष्ट्रात तरी एकटाच असणार आहे. काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभेला जे महाराष्ट्रात आणि मुंबईत यश मिळाले ते शिवसेनेचा उध्दव ठाकरे चेहरा आणि राष्ट्रवादीचा शरद पवारांचा चेहरा, काँग्रेसचा राज्यातील चेहरा कोण? हा अजूनही प्रश्न आहे.
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा प्रादेशिक असल्याने तो ठाकरे बंधूंसोबत जाऊ शकतो, त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेना–राष्ट्रवादी शिवाय काँग्रेसची देखील कसोटी लागणार आहे. भाजपला प्रादेशिक पक्षांचे राजकारण संपवायचे आहे, मात्र त्यासाठी केवळ प्रादेशिक पक्षांची तोडफोड कऊन ते संपणार नाहीत, तर त्यासाठी आधी प्रादेशिक जनतेचा आवाज संपवावा लागेल, आणि तो न संपणारा आहे, हे मेळाव्याने दाखवून दिले आहे.
मराठी भाषिकांच्या मनात अस्वस्थता आहे. मराठी अस्मिता तसेच भाजप–शिंदे सरकारची भूमिका ही मराठी भाषिकांवर लादणारी आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा दिलेला नारा, यामुळे मराठी भाषिकांना राज ठाकरे व उद्धव ठाकरे बंधूंची एकता हा आधार वाटत आहे.
भाजप आणि शिंदेंकडील आऊटगोईंग बंद होणार?
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठ्या संख्येने होत असलेले पक्षांतर शनिवारी झालेल्या मेळाव्यानंतर थांबेल असे दिसत आहे. कारण दोन ठाकरे एकत्र आल्यास अनेक ठिकाणची स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कुंपणावरील काही दिवस वेट अॅन्ड वॉचमध्ये तर जे इतर पक्षात गेलेत त्यांना देखील आत्मचिंतन करण्याची वेळ येऊ शकते.
प्रादेशिक मुद्यांवर प्रचार वाढणार
ठाकरे बंधू एकत्र आल्यावर मराठी माणसाचा आवाज पुन्हा एकत्र होताना दिसत आहे. मराठी स्वाभिमान हा पुन्हा केंद्रस्थानी येताना दिसणार आहे. प्रादेशिक मुद्यांवर आंदोलन, प्रचार वाढणार, त्यात राष्ट्रीय पक्षांची भूमिका जरी वेगळी असली तरी शिंदेंच्या शिवसेनेची मात्र भूमिका घेताना गोची होणार आहे.
राज यांची भूमिका महत्त्वाची राहणार
ठाकरे बंधू शनिवारी मेळाव्यासाठी एकत्र आले. मेळाव्यानंतर विरोधकांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली, मात्र राज यांची पाठराखण केली. राज यांच्या भाषणाचे सगळ्यांनी कौतुक केले, त्यामुळे भविष्यात राज यांच्यावर उध्दव यांच्यासोबत जाऊ नये, यासाठी मोठा दबाव असणार आहे. त्यातच उध्दव ठाकरे यांनी एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी हे वक्तव्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भविष्यात राज यांनी कच खाल्यास मोठा फटका त्यांनाच बसणार आहे.
राज–उध्दव यांना एकत्र आणण्यात खरंच फडणवीस आहेत का?
जे बाळासाहेबांना जमले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे वक्तव्य दोन्ही ठाकरे बंधूंनी केले. संजय राऊत आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युतीमागे फडणवीसच असल्याचे सांगितले, त्यामुळे फडणवीस यांना शिंदेंना शांतपणे बाजूला करायचे आहे का? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करायची आहे, मात्र फडणवीसांना त्यांना मुंबईतील वडाळा येथील प्रतिपंढरपूर असलेल्या विठ्ठलातील पूजेचा मान द्यायचा असेल तर उध्दव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यात फडणवीस यांचा अप्रत्यक्ष रोल असल्याचे बोलले जात आहे








