वृत्तसंस्था/सुहल, जर्मनी
भारताचा स्कीट नेमबाज रायझा धिल्लनने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप 2025 नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. तीन पदकांसह भारताने आघाडीचे स्थान मिळविले आहे. 21 वर्षीय धिल्लनने गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियनशिपमध्येही रौप्य मिळविले होते. तिने अंतिम फेरीतील 60 शॉट्समध्ये 51 गुण मिळवित दुसरे स्थान मिळविले. ब्रिटनच्या फीबी बोडली स्कॉटने 53 गुण नोंदवत सुवर्ण पटकावले. कनिष्ठांच्या या स्पर्धेत बोडली स्कॉटने मिळविलेले हे दुसरे सुवर्ण आहे. तीन वर्षांपूर्वी तिने याच ठिकाणी याच स्पर्धेत हे यश मिळविले होते. जर्मनीच्या अॅनाबेला हेटमरने 38 गुण घेत कांस्यपदक मिळविले.
तत्पूर्वी, रायझाने पात्रता फेरीत 116 गुण नोंदवून दुसरे स्थान घेत सहा महिलांच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती. भारताच्या वंशिका तिवारी (109), यशस्वी राठोड (106), मोहिका सिसोदिया (100) यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे 15, 19 व 20 वे स्थान मिळविले होते. पुरुषांच्या स्कीट नेमबाजीत भारताच्या हरमेहर सिंग लालीला अंतिम फेरी गाठण्यात थोडक्यात अपयश आले. त्याने पात्रता फेरीत 117 गुण घेत सातवे स्थान मिळविले. याशिवाय झोरावर सिंगने 112 गुणांसह 29 वे, इशान सिंग लिब्रा (111), ज्योतिरादित्य सिंग सिसोदिया (110), अतुल सिंग राजावत (105) यांनी अनुक्रमे 35, 38 व 54 वे स्थान मिळविले. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या उर्वा चौधरी व चिराग शर्मा यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. त्यांनी 576 गुण घेतले. पात्रता फेरीत त्यांनी पाचवे स्थान मिळविले होते.









