वृत्तसंस्था/ कुवेत सिटी
येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्र फेरीच्या शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताची 19 वर्षीय महिला नेमबाज रैझा धिलाँने रौप्यपदक मिळवून पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोटा पद्धतीनुसार स्थान मिळवणारी धिलाँ ही भारताची अठरावी नेमबाज आहे. पुरुषांच्या स्किट शॉटगन नेमबाजी प्रकारात भारताच्या अनंतजीत सिंग नेरुकाने रौप्यपदक मिळवून पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. या क्रीडा प्रकारात तैपेईच्या ली ने 57 शॉट्ससह सुवर्ण तर नेरुकाने 56 शॉट्ससह रौप्यपदक मिळवले.
महिलांच्या शॉटगन नेमबाजी स्पर्धेत अंतिम फेरीत एकूण सहा स्पर्धकांचा समावेश होता. भारताच्या धिलाँने 52 शॉट्स नोंदवत रौप्यपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात चीनच्या जीनमेई गेयोने 56 शॉट्ससह सुवर्णपदक तर भारताच्या माहेश्वरी चौहानने 43 शॉट्ससह कास्यपदक मिळवले. या क्रीडा प्रकारात भारताच्या गनेमत सेखाँला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.









