श्रीपूर / विनायक बागडे :
महाळूंग-श्रीपूर येथील राज ॲग्रो सर्व्हिसेसच्या कोल्ड स्टोरेजला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत सुमारे पंधराशे टन बेदाणा व पाचशे टन सोयाबीनचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते.
निर्यात क्षम शेतमाल साठवून ठेवण्यासाठी या कोल्ड स्टोरेज वापर केला जात होता. राज ॲग्रो सर्व्हिसेस यांचे सात हजार मेट्रीक टन साठवण क्षमतेचे कोल्ड स्टोरेज आहे. हे कोल्ड स्टोरेज 5 हजार टन व 2 हजार टन एवढय़ा क्षमतेच्या दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात आले आहे. त्यापैकी 2 हजार टन साठवण क्षमतेच्या कोल्ड स्टोरेजला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या कोल्ड स्टोरेजमध्ये सुमारे पंधराशे टन बेदाणा व पाचशे टन सोयाबीन साठवून ठेवण्यात आले होते. बेदाण्याची किंमत सुमारे वीस कोटी व सोयाबीन ची किंमत सुमारे दहा कोटी आणि कोल्ड स्टोरेजची मालमत्ता सुमारे दहा कोटी असे मिळून सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या कोल्ड स्टोरेज मालक तथा व्यवस्थापकीय संचालक स्वप्नलि घोगरे यांनी सांगितले.
गुरूवारी शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखाना व माळीनगर येथील दि. सासवड माळी साखर कारखाना तसेच सहकार महर्षि, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना आणि पंढरपूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडय़ांनी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, परंतु अग्निशामक दलाचे हे बंब अपुरे पडत असल्याने आगेचा भडका वाढतच होता, रात्री दहाच्या सुमारास आग आटोक्यात आली.