स्पंदनतर्फे पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबर देशातून बालविवाह हद्दपार करण्यासाठी अभियान राबविण्यात आले आहे, अशी माहिती स्पंदन संस्थेच्या संचालिका व्ही. सुशिला यांनी पत्रकार परिषदेत दिली. बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल कल्याण खाते, पोलीस खाते, कामगार खाते, जिल्हा बाल संरक्षण विभाग, महसूल विभाग, महापालिका कार्यरत आहे. बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध यशस्वी उपक्रम राबविले जात आहेत. स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून 2023-24 सालात 300 हून अधिक बालविवाह रोखण्यात स्पंदन संस्थेला यश आले आहे. यासाठीच अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बडेकोळमठ चंदन होसूर, भुतरामहट्टी मुक्तीमठ आदी ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये जागृतीचे काम हाती घेतले जाणार आहे.









