खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचे आमदार भीमराव तपकिर यांना निवेदन
बेळगाव : नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असून यावेळी सीमाप्रश्नाबाबत आवाज उठवावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्रातील आमदारांना करण्यात आली. पुणे येथील खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव तपकिर यांना सीमाप्रश्नासाठी निवेदन देण्यात आले. पुणे येथे खानापूर व बेळगाव मित्रमंडळाच्यावतीने उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार भीमराव तपकिर उपस्थित होते. याचे औचित्य साधून खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पुणेस्थित सहकारी वैराळ सुळकर, प्रमोद गुरव, श्रीधर पाटील, स्वप्निल पाटील, किशोर पाटील यांनी निवेदन सादर केले. हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नाबाबत आवाज उठवावा व सीमावासियांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. युवा नेते शुभम शेळके व खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदार तपकिर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी खानापूर मित्रमंडळाचे संस्थापक पीटर डिसोझा, विद्यमान अध्यक्ष विजय पाटील, बेळगाव फौंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम भेकणे व इतर सदस्य उपस्थित होते.









