सध्या जगात एक विचित्र प्रकारचा असमतोल निर्माण झाला आहे. काही देशांमध्ये लोकसंख्या कमी होत आहे. काही देशांमध्ये ती मोठ्या वेगाने वाढत आहे, तर काही देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. जे देश कमी होणाऱ्या लोकसंख्येचे आहेत किंवा वृद्धांची संख्या अतोनात वाढलेली आहे, त्यांनी आपल्या नागरीकांना मुले अधिक संख्येने जन्माला घालण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविण्यास प्रारंभ केला आहे. विविध आकर्षक योजना आणल्या आहेत.

चीनमधील एका पर्यटन कंपनीने आणलेली योजना सर्वात आकर्षक म्हणावी लागेल. चीनला सध्या लहान मुले आणि तरुणांची तातडीची आवश्यकता आहे. मुले अधिक संख्येने जन्माला आली तरच भविष्यकाळात तरुणांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यानी जास्तीत जास्त मुले जन्माला घालावीत, यासाठी या कंपनीने प्रत्येक नवजात अपत्यामागे तब्बल 5 लाख रुपयांचे ‘बक्षिस’ घोषित केले आहे. याचा परिणाम कितपत होणार हे कालांतराने समजेलच. पण ही योजना आकर्षक आहे हे निश्चित. चीन, जपान, युरोपातील काही देश आदींनी अशा विविध योजना आणण्याचा सपाटा लावला आहे. 1980 ते 2015 या 35 वर्षांच्या काळात चीनने एक कुटुंब एक मूल असे धोरण कठोरपणे लागू केल्याने तेथे वृद्धांचे प्रमाण वाढले आहे. आता चीनला धोरणपरिवर्तन करायचे आहे. येथील एका टेक कंपनीने तर कर्मचाऱ्याने तिसऱ्या अपत्याला जन्म दिल्यास साडेअकरा लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले असून त्याचा परिणाम दिसून येत आहे.









