‘नो गजबजाट, ओन्ली शुकशुकाट : रविवार असूनही पावसामुळे बाजारपेठ थंड, खरेदी-विक्रीवर परिणाम
बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्याला रविवारी जोरदार पावसाने झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. शहराजवळून वाहणारी मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहत असून बेळ्ळारी नाल्याला आलेल्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे रविवारचा दिवस हा मुसळधार रेनी संडे ठरला. एरव्ही रविवार म्हटला की मुख्य रस्त्यांवरील वर्दळ, वाहतूक कोंडीची समस्या, बाजारातील गर्दी, बसस्टॉपवरील चेंगराचेंगरी असे चित्र पहायला मिळते. परंतु, या रविवारी मात्र बेळगावमध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र शुकशुकाट व ग्राहकांची वाट पाहणारे विक्रेते असे चित्र पहायला मिळाले. साप्ताहिक सुटी असूनही पावसामुळे घरीच राहण्याची वेळ नोकरदारांवर आली. त्यामुळे एरव्ही ‘फन डे’ म्हणून साजरा होणारा रविवार यावेळी मात्र ‘रेन डे’ ठरला.
साप्ताहिक सुटी आणि त्यात आलेला पाऊस यामुळे बाहेर वर्षा पर्यटनासाठी जाण्याचा बेत अनेकांनी आखला होता. चौथा शनिवार व रविवार अशा सलग सुट्या आल्याने नोकरदारांनी तयारीही केली होती. परंतु, पावसाचा जोर वाढला असल्याने महत्त्वाच्या पावसाळी वर्षा पर्यटनस्थळांवर धोका निर्माण झाल्याने बेत रद्द करावा लागला. विकेंड असला की बेळगाव शहरात खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. केवळ बेळगावच नाही तर आजूबाजूच्या गावातून आणि गोव्यातूनही ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात. परंतु, या रविवारी सकाळपासूनच धुवाधार पाऊस सुरू असल्याने घरीच राहिलेले बरे, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली. एरव्ही गजबजलेली गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार परिसर रविवारी मात्र शांत होता. बसथांब्यांवरही शुकशुकाट पसरला होता. यामुळे प्रवाशांची वाट पाहणाऱ्या रिक्षाचालकांनी दुपारनंतर घरी जाणे पसंत केले.रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असते. परंतु, पावसामुळे कोणीच फिरकले नसल्याचे चित्र दिसले. याचा फटका छोट्या विक्रेत्यांना सर्वाधिक बसला. भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, फळे, कपडे विक्री करणारे छोटे विक्रेते ग्राहकांची वाट पहात होते. परंतु, पावसाचा मारा वाढल्याने सायंकाळपर्यंत बाजारात शुकशुकाट होता.
विजेचा लपंडाव
शनिवारी काहीसा उसंत घेतलेला पाऊस रविवारी सकाळपासून जोरदार बरसला. दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. पावसाचे प्रमाण वाढल्याने शहरातील सखल भागात पाणी शिरू लागले. गटारीही तुडुंब भरून वाहात असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहात होते. विकेंड असतानाही विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नाथ पै चौक रस्त्यावर पाणी
शहापूर येथील बॅ. नाथ पै चौक येथे पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. शहापूर-वडगाव मार्गावर पाणी आल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांना याच पाण्यातून ये-जा करावी लागली. परिसरातील सखल भागात असलेल्या घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. स्मार्ट सिटी योजनेच्या भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा शहापूरच्या नागरीकांना बसला. रविवारी खासबागचा बाजार भरतो. या बाजारात येणाऱ्या नागरीकांनाही या पाण्याचा फटका बसला.
वडगाव परिसराला तळ्याचे स्वरूप
रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने वडगावमधील सखल भागाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. आनंदनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर, केशव नगर आदी भागांमधील परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून नागरीकांना ये- जा करावी लागत होती. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले.
खानापूर तालुक्मयातील नदी-नाले दुथडी भरुन
खानापूर : खानापूर तालुक्मयात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुऊवात झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. तालुक्यातील सर्वच नदी- नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे तालुक्मयातील अनेक गावांचा संपर्क खानापूरशी तुटलेला आहे. तर तालुक्मयाच्या ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाली असून आतापर्यंत सात घरांची पडझड झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. पावसामुळे खानापूरच्या रविवारच्या बाजारावरही परिणाम दिसून येत होता.
बेळगाव-वेंगुर्ला रस्ता बंद
कानुर: बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गावर रविवार दि. 23 जुलै रोजी रात्री 8.45 वाजता कानूर खुर्द ते कानूर बुद्रुक गावादरम्यान नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आले. ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याशी संपर्क करून बेळगाव-वेंगुर्ला मार्ग बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, असेही पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले आहे. प्रवासी व वाहनधारकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
बेळगाव, खानापूर, कित्तूर,बैलहोंगलमध्ये आज शाळांना सुटी
खानापूरमध्ये पीयु कॉलेजलाही सुटी
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून बेळगाव, खानापूर, कित्तूर व बैलहोंगल या चार तालुक्यात सोमवार दि. 24 जुलै रोजी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी सायंकाळी ही माहिती दिली आहे.
बेळगाव शहर-तालुका, खानापूर शहर-तालुका, कित्तूर व बैलहोंगल तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या सहा दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे शनिवार दि. 22 जुलै रोजी खानापूर तालुक्यात शाळांना सुटी देण्यात आली होती. आता रविवारी या आदेशात बदल करून खानापूरबरोबरच बेळगाव, कित्तूर, आणि बैलहोंगलचाही समावेश करण्यात आला आहे. खानापूर शहर व तालुक्यातील पीयुसी कॉलेजनाही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली आहे.
या चारही तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे शाळकरी मुलांच्या काळजीपोटी हा निर्णय घेण्यात आला असून सोमवारची परिस्थिती पाहून पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. यासंबंधी रविवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. खानापूर वगळता इतर तालुक्यातील सर्वच कॉलेज सुरू राहतील.









