574 तारांकीत तर 1500 अतारांकीत प्रश्न : 10 खासगी विधेयक तर 3 खासगी ठराव
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य विधानसभेचे 10 दिवसांचे पावसाळी अधिवेशन आज सोमवार दि. 11 जुलैपासून सुरु होत असून त्यात विविध प्रश्नावरुन सत्ताधारी – विरोधी पक्षात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. यापूर्वी ठरवण्यात आलेले 25 दिवसांचे अधिवेशन आता पंचायत निवडणुकीमुळे कमी करुन 10 दिवसांवर आणले आहे. हे अधिवेशन 22 जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात 574 तारांकीत तर 1500 अतारांकीत प्रश्नांचा समावेश असून एकूण 10 खासगी विधेयके व 3 खासगी ठराव सादर करण्यात आले आहे.
शिवाय निधन झालेल्यांचे शोकप्रस्ताव, अभिनंदन ठराव, लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तर तास शुन्य तासाचे कामकाजही विधानसभेत होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चाही तेथे करण्यात येणार असून 13 ते 22 जुलैपर्यंत अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे.
उपसभापती निवडणुकीची अधिसूचना सभापतींनी मागे घेतल्याची सूचना विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी जारी केली असून त्यासाठी अर्ज स्वीकारु नयेत असे त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, सदर अधिसूचना नेमक्या कोणत्या कारणासाठी मागे घेण्यात आली याचा उल्लेखच सूचनेत करण्यात आलेला नाही. सर्व आमदारांनी याची नोंद घ्यावी, असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.









