कोल्हापूर / दीपक जाधव :
राज्य शासनाने 29 सप्टेंबर 2016 रोजीच्या ड नियमावलीनुसार 500 चौरस मीटरपेक्षा मोठ्या बांधकामांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. नवीन बांधकाम नियमावलीतही पावसाच्या पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य देण्यात आले आहे. नियमांनुसार, पावसाचे पाणी बोअर रिचार्जसाठी वापरले जाते; परंतु खास टाक्या बांधून रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे प्रमाण अवघे दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग असलेल्या इमारतींना घरफाळ्यात सूट दिली असली, तरी केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाला आहे.
मोठे गृहप्रकल्प आणि व्यावसायिक बांधकामे वगळता, कोल्हापूर शहरात पूर्णत्वाचा दाखला घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मागील वर्षी सुमारे दोन हजार नवीन बांधकामांना परवानगी मागितली गेली, त्यापैकी 1,700 हून अधिक प्रस्ताव मंजूर झाले. मात्र, पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी फक्त 600 पेक्षा कमी प्रस्ताव आले. बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाच्या दाखल्यादरम्यान सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर वाढवण्यासाठी कठोर नियमावलीची गरज आहे.

- नियम आणि अंमलबजावणी
राज्य सरकारने 2007 मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात प्रथम अध्यादेश जारी केला आणि 2016 मध्ये नियम क्रमांक 34 नुसार 500 चौरस मीटरपेक्षा मोठ्या इमारतींसाठी हा नियम कठोर केला. नवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीवरच परवानगी दिली जाते. यासाठी जमिनीखाली टाक्या बांधणे, विहिरी किंवा बोअरमध्ये पाणी सोडणे, किंवा सात मीटर खोल खड्ड्यात दगड, वाळू, विटांचे थर रचून पाणी जमिनीत मुरवणे असे पर्याय सुचवले आहेत. नियमित रेन वॉटर हार्वेस्टिंग न केल्यास महापालिका एक हजार चौरस फुटाला एक हजार रुपये दंड आकारू शकते. मात्र, सूत्रांनुसार, नियोजित टाक्या बांधून रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे, तर जुन्या इमारतींमध्ये हे प्रमाण आणखी कमी आहे. जमिनीत एक पाइप रोवून छतावरील पाणी जमिनीत सोडले असे दाखवले जाते. यंत्रणाही शास्त्राrय पद्धतीने भू जल भरण झाले का याकडे कानाडोळे करत असल्याचे वास्तव आहे.
- योग्य नियोजनाची गरज
कोल्हापूरात सरासरी 1,800 मिमी पाऊस पडतो, तरीही ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवते. जगातील सर्वाधिक पाऊस पडण्राया चेरापुंजीत (11,000 मिमीपेक्षा जास्त) पाण्याच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई निर्माण होते. कोल्हापूरातही गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करावी लागली, तर धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण हा पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय ठरू शकतो. भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि जिह्याची पाणीभरण क्षमता सुधारण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
- रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फायदे
बाह्य पाणीपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होते, स्वयंपूर्णता वाढते. भूजल उपसण्याचा खर्च कमी होतो. उच्च दर्जाचे, कमी खनिजयुक्त पाणी मिळते. शहरी भागात मातीची धूप कमी होते. भूजल पातळी वाढल्याने पाणी खेचण्यासाठी विजेची बचत होते. पाण्याचा दर्जा सुधारतो, जमिनीची धूप रोखली जाते. बोअर आणि विहिरींचे पुनर्भरण होऊन ख्राया पाण्याची तीव्रता कमी होते. शास्त्राsक्त पद्धतीने साठवण केल्यास वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तयार होतो.
- प्राचीन पाणी साठवणूक पद्धती
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे छत, उद्याने, रस्ते आणि मोकळ्या जागांमधून वाहणारे पावसाचे पाणी गोळा करून साठवणे किंवा भूजल पुनर्भरण करणे. चीनमध्ये 6,000 वर्षांपूर्वी, तर किमान 4,000 वर्षांपूर्वीपासून पाणी साठवणुकीचे पुरावे आहेत. पृष्ठभागावरील पाणी संकलन, छप्पर प्रणाली, जमिनीतील टाक्या, धरणे आणि जलाशयांद्वारे पाणी साठवले जाते. याचा उपयोग घरगुती, शेती आणि भूजल पुनर्भरणासाठी होतो.








