सकिंग मशीनद्वारे काढले पाणी, गटारीचीही केली स्वच्छता
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पाणी साचून तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अधिकारी व नागरिकांना पाण्यातून वाट शोधण्याची वेळ आल्याने सोमवारी महापालिकेच्यावतीने सकिंग मशीनद्वारे तुंबलेले पाणी काढण्यात आले. त्याचबरोबर प्रवेशद्वारावरील गटारीतील केरकचरा काढून गटार स्वच्छ करण्यात आली. शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या आवारातच पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती. प्रवेशद्वारावर घालण्यात आलेले पेव्हर्स आणि काँक्रीट अशास्त्राrय पद्धतीने घालण्यात आले असल्याने पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. त्यामुळे दरवेळी पावसाळ्यात प्रवेशद्वारावरच पाणी तुंबून रहात आहे. तशा पाण्यातूनच मनपा अधिकारी, नगरसेवक व नागरिकांना ये-जा करावी लागत होती. पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी लहानशी गटार बनविण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये केरकचरा तुंबल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला होता.
तुंबलेले पाणी काढण्याची सूचना
रविवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर पाणी तुंबून तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. सोमवारी सकाळी मनपा आयुक्त शुभा बी. या कार्यालयात आल्या असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यामुळे त्यांनी तातडीने तुंबलेले पाणी काढण्याची सूचना केली. त्यानुसार सकिंग मशीनद्वारे पाणी काढण्यासह गटार देखील स्वच्छ करण्यात आली.









