साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय
बेळगाव : वडगाव येथील पाटील गल्ली, मंगाईनगर क्रॉस परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसाने तर याठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. अशा पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे ही समस्या जाणवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मंगाई मंदिर शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही वर्षांपासून वारंवार पाणी साचत आहे. विशेषत: पावसाच्या दिवसात या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेकवेळा तक्रार करूनदेखील त्याकडे लक्ष पुरविण्यात आलेले नाही. लहान मुले, वयोवृद्धांना या पाण्यातूनच शाळा, तसेच इतर कामांसाठी ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने ही समस्या सोडवून या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









