नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचा वेगवान प्रवास, जूनमधील अधिकची सरासरी आणि जुलैमधील दमदार पावसाचा अंदाज बघता यंदाचे वर्ष हे पावसापाण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने पाणीदार ठरावे. जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने. त्यातला जून हा मान्सूनच्या प्रवासाचा. संपूर्ण देश काबीज करण्यासाठी मोसमी वाऱ्यांना 8 जुलैपर्यंतचा कालावधी लागतो. त्यामुळे सहसा जून महिन्यात पाऊस हा उण्यातच असतो. यंदा मात्र अंदमान-निकोबार बेटांबर मान्सून 9 दिवस आधी, केरळमध्ये आठ दिवस आधी, तर महाराष्ट्रात तो 13 दिवस आधीच सक्रिय झाल्याचे दिसून आले. 8 जुलै रोजी संपूर्ण देश व्यापणाऱ्या मान्सूनने यंदा 9 दिवस आधीच म्हणजेच 29 जूनला देश व्यापला आहे. मधल्या काळात त्याने थोडी विश्रांती घेतली. परंतु, त्यानंतर पुन्हा त्याचा ओघ सुरू झाल्याचे पहायला मिळाले. आता उत्तरेतदेखील पावसाला सुऊवात झाली आहे. जून महिन्याची देशातील पावसाने सरासरी ओलांडली असल्याचे आकडेवारी सांगते. साधारण जूनमध्ये देशात 165.3 मिमी पाऊस होतो. या वर्षी 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 29 जूनपर्यंत सरासरीच्या 8 टक्के अधिकचा पाऊस देशभर झाला आहे. सर्वसाधारणपणे सरासरीच्या 109 टक्के अधिक हे पर्जन्यमान आहे. याशिवाय वायव्य भारतात सरासरीच्या 37 टक्के अधिक, तर मध्य भारतात सरासरीच्या 24 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. दक्षिण भारतात उणे 2, तर पूर्व व पूर्वोत्तर भारतात उणे 17 टक्के पाऊस झाला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, चंदीगड, दिल्ली, अंदमान निकोबार पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात अतिरिक्त पाऊस झाला आहे. यात राजस्थानमधील पावसाचा धडाका अभूतपूर्वच ठरावा. तेथे काही भागात रस्त्यावर तब्बल दोन फुटांपर्यंत पाणी आल्याचे दिसून आले. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये तर चार ठिकाणी ढगफुटी झाल्याची नोंद असून, येथील भूस्खलन व पुरात 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शिवाय 16 जण बेपत्ता असून, 10 ते 15 घरांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. उत्तराखंड राज्याचे धार्मिकदृष्ट्या स्थान फार वरचे आहे. निसर्गाने नटलेल्या या भागाला सातत्याने ढगफुटी व अतिवृष्टीचा फटका बसतो. या वर्षीही अनेक भागात ढगफुटीसदृश पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. भूस्खलन व पूरपरिस्थितीमुळे महामार्गही ठप्प झाले. पावसाचे आणखी तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यापुढे उत्तरेतील राज्यांना अॅलर्ट रहावे लागेल. जून महिन्यात महाराष्ट्रातही पावसाने सरासरी ओलांडली असून, सात टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये कोकणात 15 टक्के, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 37 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. अर्थात कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर पावसाची कृपादृष्टी झाली असली, तरी तुलनेत विदर्भ, मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या उणे 40 टक्के, तर विदर्भात उणे 16 टक्के पाऊस झाला आहे. येथील धरणांची स्थितीही म्हणावी तशी चांगली नाही. हे बघता या भागाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा असेल. हे चित्र असले, तरी महाराष्ट्राच्या काही भागालाही पावसाचा तडाखा बसला. कमी वेळेत जादा पाऊस, हे त्याचे कारण. सध्या ठिकठिकाणी पावसाचा हा ट्रेंड पहायला मिळतो. त्याला नियोजनाचा अभाव, वाढती शहरे, ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी यांसारख्या गोष्टीही कारणीभूत असल्याचे दिसून येते. एकूणच पावसाळ्याचा विचार केला, तर जुलैमध्ये खऱ्या अर्थाने पाऊस होतो. या काळात देशात सरासरी 280 मिमी पाऊस होत असतो. शेतीमातीच्या दृष्टीनेही या महिन्यातील पाऊस महत्त्वाचा असतो. हवामान विभागाकडून जुलैमध्ये देशभरात 106 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जुलैमध्येच देशातील बहुतांश धरणे भरण्याची चिन्हे असतील. महाराष्ट्रातील सर्व धरणांचा मिळून पाणीसाठा जवळपास 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. यात कोकण विभागात 57.43, पुणे 52.41, नाशिक 44, छत्रपती संभाजीनगर 34.57, अमरावती 43.95, नागपूर 31.82 टक्के इतका साठा आहे. पहिल्यावहिल्या महिन्यातच धरणातील जलसाठा 50 टक्क्यांवर पोहोचणे, ही अपवादात्मकच स्थिती म्हणता येईल. जुलैमध्ये हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पाऊस झाला, तर महाराष्ट्रासह देशभर आबादानी होईल. मागच्या काही वर्षांचा विचार केला, तर भारतात सरासरीपेक्षा अधिक किंवा सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. त्यामुळे देशाला दुष्काळापासून चार हात दूर ठेवता आले. असे असले, तरी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे दुष्टचक्र आपल्याला अजूनही भेदता आलेले नाही. म्हणूनच पावसाळ्यात होणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. त्यादृष्टीने पाणी अडवा, पाणी जिरवा, या मोहिमेला गती दिली पाहिजे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये प्रचंड पाऊस होतो. तथापि, पावसाचे हे पाणी बऱ्याचदा वाया जाते वा समुद्राला मिळते. म्हणूनच पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा आणि कुठे उपयोग करता येईल, हे पहायला हवे. देशातील काही भाग हे अवर्षणग्रस्त आहेत. तेथे मुलताच पाऊस कमी होतो. अशा भागात पाणी कसे वळवता येईल, हे पहायला हवे. त्यातूनच पाण्याचा असमतोल दूर करणे शक्य होईल. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. भविष्यातील लढाया या पाण्यासाठी होतील, असे विचारवंत सांगत असतात. पाण्याचे मोल लक्षात घेतले, तर ही अतिशयोक्ती मानता येत नाही. म्हणूनच जलव्यवस्थापन, पूर व्यवस्थापन ही काळाची गरज ठरते. एकीकडे पूर व्यवस्थापनाच्या माध्यमातून पूरस्थितीशी सामना करतानाच पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन कसे करायचे, हे पाहिले पाहिजे. पाणी गळती, पाण्याचा अपव्यय यासंदर्भात उपाययोजना करून पाणी बचतीचा मंत्र प्रत्येकाने अवलंबला, तर बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे पावसाची वारी सुरूच राहण्याची आशा असून, त्यातून देश सुजलाम् सुफलाम् व्हावा, हीच अपेक्षा असेल.
Previous Article‘अकासा’चा प्रवास तोट्यात
Next Article भारत-इंग्लंड दुसरी कसोटी लढत आजपासून
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








