मुंबईत विक्रमी पाऊस : राज्य प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश बारामतीत ढगफुटी
प्रतिनिधी / पुणे
मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच राज्याच्या सर्वच भागात पावसाने सोमवारी दाणादाण उडवून दिली. पावसाच्या या तडाख्यामुळे बारामती, पंढरपूरसह महाराष्ट्राच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यभर पावसाने जोरदार हजेरील लावली आहे. गेल्या 24 तासात सर्वदूर पावसाचा ऊद्रावतार पहायला मिळाला. पावसाने सगळीकडे दाणादाण उडाली असून, जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीजवळ निर्माण झालेले न्यून दाबाचे क्षेत्र आधी उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज होता. मात्र तसे न होता हे क्षेत्र रत्नागिरी किनारपट्टीजवळ धडकले. यामुळे आधीच सुरू असलेल्या पावसात आणखी भर पडली. सध्या या क्षेत्राचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून, ते मराठवाडा व लगतच्या भागावर आहे. अरबी समुद्राकडून राज्यात आर्द्रतायुक्त येणारे वारे वाढल्यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात रविवारपासून पावसाचा जोर वाढला. अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात रविवारी आणि सोमवारीदेखील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, सातारा, पुणे आदी जिह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. मुंबईमध्ये पावसाची तीव्रता अधिक असल्याने अनेक भागात पाणी साठले. वाहतूक आणि लोकल सेवा संथ गतीने सुरू होती. पुण्यात पावसाची संततधार सुरूच असून, रात्री पावसाची तीव्रता अधिक होती. बारामती, इंदापूरसारख्या भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला. अनेक भागात 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला. याशिवाय नाशिक, पिंपरी चिंचवडसारख्या महानगरांनाही पावसाने जबर तडाखा दिला. नाशकात पावसाने कांदापिकाचे नुकसान झाले. याशिवाय अन्य जिल्ह्यांत पिकपाण्याला पावसाचा फटका बसला. शेतीपूर्व काम होण्याआधीच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरीही चिंतीत आहेत.

मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा
पश्चिम किनारपट्टीवर पुढील आठवडाभर मुसळधार ते अति मुस्ळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर पुढील आठवडाभर पाऊस राहणार आहे. मंगळवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट क्षेत्र परिसरात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, रायगड, पुणे घाट परिसर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. राज्याच्या इतर भागात येलो अलर्ट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर कोकण आणि मध्य महाराष्ट्र पावसाचा जोर राहणार आहे. तर कोकण किनारपट्टी खवळलेली असून, अद्यापही ती मच्छीमारांसाठी धोकादायक आहे.
बारामतीत पूर, अजितदादांकडून पाहणी
बारामतीत पुरामुळे जवळपास 150 ते 200 घरे बाधित झाली. तर इंदापूरमध्ये 70 गावांमधील अनेक घरे बाधित झाली. याशिवाय दौंड तालुक्यालाही पावसाने तडाखा दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीच्या विनंतीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने दोन विशेष पथके तैनात केली. दरम्यान, पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बाधित भागाची पाहणी केली. यावेळी बारामतीतील स्थानिकांनी अतिक्रमणांकडे लक्ष वेधले. पूरस्थितीला ही अतिक्रमणे कारणीभूत असल्याचे म्हणणे काही नागरिकांनी मांडले.
राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क आणि सज्ज रहावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. पावसामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आढावा घेतला.

अमित शहा रविवारपासून नागपूर, नांदेड आणि मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. तरीही ते राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. एनडीआरएफ-एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन तसेच गफह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत तसेच बचावासाठीची सज्जता ठेवण्याच्या अनुषंगानेही त्यांनी सूचना केल्या. जलसंपदा विभागाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याबाबतही फडणवीस यांनी निर्देश दिले.
परिस्थिती हाताळण्यास यंत्रणा सज्ज : गिरीश महाजन
राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी आढावा घेतला. राज्य आपत्कालीन कार्य पेंद्रात महाजन यांनी तातडीने भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी यंत्रणा 24 तास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे, सातारा, सोलापूरमध्ये अतिवृष्टी
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि मुंबई महानगर या भागात अतिवफष्टी झाली. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला.
रेस्क्यू टीम कार्यरत
बारामतीत 25 घरांची अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. मोबाईल सेवा काल विस्कळति झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे दोघांना पूरस्थितीतून बाहेर काढले. ’एनडीआरएफ‘चा एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.माळशिरस तालुक्यात सहा नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रायगडमध्ये एका व्यक्तीचा वीज पडून मफत्यू झाला आहे तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवफष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
मेट्रोच्या छतातून पाणी
मुंबईतील एक्वा लाइन -3 या भुयारी मेट्रो मार्गात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचले. भुयारी मेट्रो मार्गाच्या पायऱ्यांवरुनही पाणी वाहू लागल्याने धबधबा सदृश चित्र होते. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. दरम्यान, पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, या भुयारी मेट्रोकडे जाणारा मार्गही बंद करण्यात आला. पावसाचे पाणी भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये शिरले असून पाण्याचा लोंढा आत शिरल्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांच्या छतामधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.
लाखोंचे नुकसान
वरळीच्या भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याने येथील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले. पाणी शिरल्यामुळे या मेट्रो स्थानकातील अनेक गोष्टी निकामी झाल्या. याच मेट्रो लाइनच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा पाणी साचले आहे. या परिसरात वास्तव्यास असण़ार्या नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. महत्त्वाची बाब म्हणजे, महायुती सरकारचा हा अत्यंत महत्त्वाचा असा हा भुयारी मेट्रो प्रकल्प आहे.
पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस : राज्य सरकारकडून सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात पावसाचे संकट आणखी तीन दिवस असणार आहे. सोमवारी सहा जिह्यांना रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील तीन दिवसांत ही राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिह्यात काही ठिकाणी 50‚60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील पावसाच्या संकटामुळे 27,28 व 29 मे रोजी होण़ार्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.








