आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान : करंबळनजीक झाड पडल्याने वाहतूक ठप्प करंबळ : खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामास पोषक वातावरण
► प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहरासह तालुक्यात वळिवाच्या पावसाने सोमवारी सायंकाळी हजेरी लावली. खानापूर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र नंदगड परिसरासह हेब्बाळ, बेकवाड, लालवाडी, करंबळ, नावगा परिसरात वळिवाच्या पावसाने जोरदार झोडपले असून शेतात पाणीच पाणी झाले आहे. वळिवाच्या पावसात सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे बेकवाड परिसरातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हा पाऊस उसासह इतर पिकांना पोषक ठरला असून खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिन्याभरापासून वळिवाने खानापूर तालुक्यात हुलकावणी दिली होती. गेल्या दोन दिवसापासून हवामानात प्रचंड उष्मा वाढलेला होता. रविवारी पाऊस पडणार असे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. सोमवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्णता होती. दुपारी 3 नंतर आकाशात गडगडाटासह आकाश काळ्या ढगानी व्यापले होते. खानापूर शहरात दुपारी 4 वाजता पावसाला सुरुवात झाली होती. हाच पाऊस हेब्बाळ, नंदगड, बेकवाड परिसरात वळिवाच्या पावसाने जोरदारपणे झोडपले आहे. हेब्बाळ, नंदगड परिसरात शेतात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरणीसाठी आवश्यक असणारी ओल निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. आणि हा पाऊस उसासह इतर पिकासाठी पोषक झाला आहे.
बेकवाड परिसरातील आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे बिडी, बेकवाड परिसरात असलेल्या आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसापूर्वी सुटलेल्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तयार झालेला आंबा मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा आंबा आता अत्यंत कवडीमोल दरात विकावा लागणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
करंबळनजीक झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
सोमवारी सायंकाळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे खानापूर, नंदगड रस्त्यावरील करंबळजवळ रस्त्याच्या शेजारी असलेले मोठे आंब्याचे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक एक तासभर ठप्प झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने प्रचंड आवाज आल्याने करंबळमधील ग्रामस्थांनी रस्त्यावरील झाड पडलेल्या ठिकाणी झाड हटवण्यासाठी काम हाती घेतले. झाड कोसळल्याची माहिती वनखात्याला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि एका तासाभरात झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.









