वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अधूनमधून पावसाचा मारा सुरूच असून यामुळे शिवारातील जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला असून पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, कणबर्गी, मुचंडी, अष्टे, मोदगा, सुळेभावी आदि परिसरामध्ये वळिवाने अनेकदा हजेरी लावली आहे. अधूनमधून पाऊस होतच असल्याने जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. 25 मार्चपासून पूर्वभागामध्ये वळिवाच्या पावसाला प्रारंभ झाला असून अधूनमधून पाऊस या भागाला झोडपून काढत आहे. भातपेरणी तोंडावर आली असली तरी या भागांमध्ये अजून पेरणीपूर्व मशागतीच्या कामाना प्रारंभ झालेला नाही. याचा परिणाम पेरणीच्या कामावरही होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.
मशागतीची कामे लांबणार
भातपेरणी तोंडावर आली असली तरी सततच्या पावसामुळे अद्याप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ झालेला नाही. असाच पडत राहिला तर मशागतीची कामे लांबणार असून याचा परिणाम पेरणीवरही होणार आहे.
– सोमनाथ मालाई
पिकांचे मोठे नुकसान
सततच्या पावसामुळे कोथिंबीर, मिरची, काकडी या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच सततच्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.
– बाळू बेडका, शेतकरी











