दिल्ली-एनसीआरमध्ये पूरस्थिती : मुसळधार पावसामुळे सहा विमाने वळवली,गुरुग्राममध्ये 90 मिनिटांत 103 मिमी पाऊस,मध्य प्रदेश-हरियाणात नदीत सहाजण बुडाले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला असून दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी रात्री मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे 6 विमाने वळवण्यात आली. 4 विमाने जयपूरला आणि 2 विमाने लखनौला उतरवल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली. तसेच काही विमानांना विलंबही झाला. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प राहिली. गुरुग्रामच्या रस्त्यांवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. तसेच वाहने पाण्यात तरंगताना दिसली. रस्त्यांवरून चालणाऱ्या लोकांच्या कंबरेपेक्षा जास्त पाणी पोहोचले. गुरुग्राममध्ये बुधवारी संध्याकाळी 90 मिनिटांत 103 मिमी पाऊस पडला. गेल्या 12 तासांत 133 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने अॅडव्हायझरी जारी करत सर्व कॉर्पोरेट कार्यालये आणि खासगी संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला दिला आहे. येथे, जबलपूर, रेवा, शहडोल, सागरसह मध्य प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे. नरसिंहपूरमध्ये नदीत बुडून 3 मुलांचा मृत्यू झाला. तसेच हरियाणातील कैथलमध्ये तलावात आंघोळीसाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला.
पूंछमध्ये भूस्खलन, 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
जम्मू काश्मीरच्या पूंछ जिह्यातील डोंगराळ भागात पावसामुळे भूस्खलन झाले. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मेंढर तालुक्याच्या चक बोनाल्ला भागात घडली. 12 वर्षीय आफिया कौसर अशी या मुलीची ओळख पटली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्येही भूस्खलनाच्या घटना सुरू असून रस्ते वाहतूक विस्कळीत होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
छत्तीसगडमध्ये धुवाँधार
छत्तीसगडमध्ये आठवडाभरापासून सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने बलरामपूर, बालोद, बालोदाबाजारसह 10 जिह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. अनेक जिह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. दुर्ग, रायपूर आणि बिलासपूर विभागातील जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. कवर्धा जिह्यातील भौरतोला येथे वीज पडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी रायपूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दाट ढगांमुळे दुपारी 3 वाजता अंधार पसरला. हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी अलर्ट जारी केला आहे. बलरामपूर, बालोद, बालोदाबाजार, धमतरी, दुर्ग, कोरिया, महासमुंद, रायपूर आणि सूरजपूर या 9 जिह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
राजस्थानातही दमदार
राजस्थानमधील सिकरमधील फतेहपूरमध्ये 90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे फतेहपूरमधील छत्रिया बसस्थानक पाण्याखाली गेले. येथे एक कार आणि बस अडकली. वाहनातील लोकांच्या बचावासाठी एका बोटीचाही वापर करावा लागला. दमोह जिह्यात, चालकाने जोरदार प्रवाहात नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला असता बस नियंत्रणाबाहेर जाऊन पुराच्या पाण्यात अडकली. ही बस दमोहहून उत्तर प्रदेशातील जालौनला जात होती. पोलीस आणि स्थानिक लोकांनी बसमधून 6 प्रवाशांना वाचवले आहे.









