वृत्तसंस्था/ करौली
राजस्थानमध्ये पावसाने खळबळ उडवून दिली आहे. अनेक भागात पाणी साचले असून नद्या-नाले तुंबल्याने आजूबाजूचा संपर्क तुटला आहे. करौली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. धुवाधार पावसामुळे करौली जिह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सुटी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नीलाभ सक्सेना यांनी सांगितले.
कोटामध्ये पावसामुळे राजस्थान आणि मध्यप्रदेशचा संपर्क पुन्हा तुटला. आंतरराज्यीय राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य महामार्ग 70 वर पुन्हा वाहतूक ठप्प झाली. कोटा ग्रामीण आणि मध्यप्रदेशालगतच्या दुर्गम भागातही पावसाचा जोर वाढला आहे. चंबळ आणि कालीसिंध नद्यांमध्येही पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे.









