सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण : खरेदीसाठी मोठी गर्दी
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी काहीशी उसंत घेतली. यामुळे शहर परिसरात विविध साहित्यांच्या खरेदीला उधाण आले. यामुळे बाजारासह शहरात नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडीलाही तोंड द्यावे लागले. गुरुवारी दुपारी रविवारपेठ, फोर्ट रोड, पाटील गल्ली, शनिमंदिर रोडपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांना रहदारीस अडचण निर्माण झाली होती.
गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण यातच गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे शहर परिसरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी पावसामुळे बहुतांश नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. गुरुवारी पावसाने उसंत घेतल्याने नागरिक गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडले. पावसामुळे चार-पाच दिवसांपासून ओस पडलेली बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्याचे पहावयास मिळाले.
गणेशाच्या स्वागतासाठी तयारी करण्याची लगबग नागरिकांकडून केली जात आहे. लवकरात लवकर विविध साहित्यांची खरेदी करून डेकोरेशन किंवा सजावट करण्यासाठी नागरिक बाजारपेठेसह गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत. गुरुवारी पावसाने उसंत घेतल्याने मोटारसायकल, कारसह इतर वाहनांच्या मदतीने नागरिक खरेदीसाठी शहरात येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे शहर परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती.
गुरुवारी सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी शहर परिसरात गर्दी केली. मात्र अनेकवेळा वाहतूक कोडींचाही सामना करावा लागला. रविवारपेठ, फोर्ट रोड, पाटील गल्ली व शनिमंदिर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना काहीकाळ रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. रविवारपेठ ही मुख्य बाजारपेठेचा मार्ग आहे. यामुळे या मार्गावर मालवाहू वाहनांची वर्दळ असते. यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी पोलीस खात्याकडे येथे योग्य वाहतूक व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.









