पावसाला जोर नसल्याने उष्म्यात वाढ : फेरीवाले, भाजीविक्रेते, बैठ्या व्यापाऱ्यांची तारांबळ
बेळगाव : शहरासह उपनगरामध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. मात्र, म्हणावा तसा दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली होती. जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविक्रेते, बैठे व्यापारी व इतर व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. गेल्या चार दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. पाऊस पडेल अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. दुपारी चारच्यादरम्यान पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. यामुळे साऱ्यांचीच धावपळ उडाली होती. मात्र, पावसाला म्हणावा तसा जोर नसल्याचे दिसून आले. पाऊस जोरदार झाला नसल्यामुळे उष्म्यामध्ये अधिकच वाढ झाली. त्यामुळे साऱ्यांच्याच अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या. त्यामुळे फॅन, कुलर यांचा आधार घ्यावा लागला. पावसाचा शिडकावा होत असल्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना आडोसा शोधावा लागला. काही भागामध्ये मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ढगांचा गडगडाट होताना दिसत होता.









