बहुसंख्य भाग कोरडा : विविध पिकांना धोका, पावसानंतर उष्म्यात वाढ
बेळगाव : बेळगाव शहराच्या उत्तर भागाला पावसाने हजेरी लावली. या व्यक्तीरिक्त इतर ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली आहे. तर तालुक्यातील काही भागात केवळ शिडकावा झाला. परिणामी लक्ष लागून राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाच्या प्रतीक्षेतच रहावे लागले. गुऊवारी सांबरा तसेच पूर्व भागामध्ये दमदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारीही शहराच्या पूर्व भागातच पाऊस पडला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचे मात्र पुन्हा आकाशाकडेच डोळे लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. दुपारनंतर पूर्व भागामध्ये ढग धरून येत होते. वळीव स्वरुपाचा पाऊस गडगडाटासह पडू लागला आहे. मात्र हा पाऊस काही ठिकाणीच कोसळत असून काही ठिकाणी मात्र शिडकावा करून विश्रांती घेत आहे. यावर्षी मान्सूनने उशिरा आगमन केले. त्यानंतर केवळ चारच दिवस जोरदार पाऊस कोसळला. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली. परिणामी सर्वच पिके धोक्यात आली आहेत. पावसाने दडी मारल्याने आता जलाशयातील पाणीसाठाही कमी झाला असून मोठा पाऊस कोसळला नाही तर पुन्हा जलाशये कोरडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शुक्रवारी काही भागात पाऊस कोसळला. त्यामुळे फेरीवाले, भाजी विक्रेते तसेच दुचाकीस्वारांना काहीसा त्रास सहन करावा लागला. मात्र केवळ अर्धातास पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा उघडीप घेतली. परिणामी हवेमध्ये गारव्या ऐवजी उष्माच वाढला. वास्तविक यावेळी मान्सून परतीचे पाऊस होणे गरजेचे आहे. मात्र परतीच्या पावसाने दडी मारली असून वळीव स्वरुपाचाच पाऊस कोसळू लागला आहे. सोयाबिन, भात, बटाटा या पिकांना धोका निर्माण झाला आहे. यावर्षी मान्सून उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडही उशिराने केली आहे. दररोज कडक उन पडत असल्यामुळे शिवारातील जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सर्वच पिके आता धोक्यात असून येत्या चार दिवसांत दमदार पाऊस कोसळला नाही तर दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. शहराच्या उत्तर भागात म्हणजेच रामदेव परिसरात अर्धा तास पाऊस झाला. तर शहराच्या मध्यभागी पावसाने केवळ शिडकावा केला. काही काळ पाऊस आला असल्याने जोरदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने हुलकावणी दिली.
जोरदार पावसाची गरज
यावर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. महिन्यापूर्वी पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले होते. त्यानंतर तो गायब झाला. दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत सारेच आहेत. मात्र शुक्रवारी पावसाने हुलकावणी दिली आहे. अनेक पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे त्यांना पावसाची नितांत गरज असून पाऊस कधी येणार याकडेच साऱ्यांच्या नजरा आहेत.









