पुणे / प्रतिनिधी :
मान्सूनच्या ऑगस्ट व सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात एल निनोची तीव्रता वाढणार असून, या कालावधीत मान्सून सरासरीएवढा राहणार असला, तरी तो शतक पूर्ण करू शकणार नसल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातही पावसाची ओढ राहणार असून, देशभर तो 94 टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचा दीर्घकालीन अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
डॉ. एम. मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषद घेत मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन तसेच ऑगस्ट महिन्याचा अंदाज जाहीर केला. तेव्हा ते बोलत होते. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 13 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतातील काही राज्यांत तुटीचा पाऊस झाला आहे, तर मध्य, वायव्य, दक्षिण तसेच उत्तर भारतातील राज्यांत दमदार पाऊस झाला. जुलै महिन्यात दोन कमी दाबाची, तर एक न्यून दाबाचे क्षेत्र निर्माण झाले, तर मान्सून ट्रफही सक्रिय असल्याने महिन्यातील 15 दिवस सर्वदूर दमदार पाऊस झाला.
ऑगस्टमध्ये पावसाची ओढ; महाराष्ट्र-कर्नाटकात पाऊस कमी
दरम्यान, ऑगस्टमध्ये देशभरात पाऊस कमी राहणार असून, सरासरीच्या 94 टक्के पाऊस राहण्याची चिन्हे आहेत. यात मुख्यत्त्वेकरुन गुजरात, राजस्थान, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच अरुणाचलच्या काही भागांत पाऊस कमी राहणार आहे.
एल निनोचा प्रभाव
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह राहणार असून, एल निनोची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम मान्सूनवरही होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मान्सून नॉर्मल राहणार असला तरी, 100 टक्क्यांवर जाणार नसल्याचे डॉ. मोहोपात्रा यांनी सांगितले.
या भागात पाऊस कमी
आगामी दोन महिन्यात पूर्व तसेच पूर्वोत्तर भारत, हिमालयच्या पायथ्याकडील राज्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, सिक्कीम या भागात दमदार पाऊस राहणार आहे. मात्र, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक, केरळ तामिळनाडू, अरुणाचल प्रदेशचा काही भागात पाऊस कमी राहणार आहे.








