पुणे / प्रतिनिधी
पूर्वमोसमी पावसाने सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्गला शुक्रवारी झोडपले. हवेच्या दोणीय स्थितीमुळे पावसाने हा दणका दिला असून, पुढील दोन ते चार दिवस या भागात तुरळक पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तविला आहे. कोकणात सिंधुदुर्गातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तसेच रत्नागिरी जिल्हय़ातही पाऊस नोंदविला गेला. अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने वातावरणातील उकाडा कमी झाला.
उत्तर कर्नाटकच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे कर्नाटकसह दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकणात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. सातारा, कोल्हापूर, सोलापुरात चांगल्या पावसाची नोंद झाली, तर सांगलीला अक्षरक्षः पावसाने झोडपून काढले. दिवसभर या भागात पावसाची संततधार सुरूच होती. यामुळे सखल भागात पाणी साठले, तर अनेक भागातील नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले.
पुढील दोन-चार दिवस दमदार पावसाचे
पुढचे चार दिवस कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस तुरळक भागात पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता आहे. अन्यत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, गोवा, तसेच मराठवाडा, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी तुरळक पावसाची शक्यता आहे. रविवारनंतर सिंधुदुर्ग व गोव्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.
म्यानमारजवळ कमी दाबाचे क्षेत्र
मर्तबनचे आखात व म्यानमार लगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, हे क्षेत्र उत्तरपूर्वेच्या दिशेने जात दक्षिण म्यानमारची किनारपट्टी पार करेल. पुढील 24 तासांत मच्छीमारांना या भागात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय याच्या प्रभावामुळे अंदमान-निकोबार बेटांवर पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अनेक जिल्हय़ांत विक्रमी पाऊस
राज्याच्या अनेक भागांत मागच्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली. सांगतील तब्बल 61.2, तर कोल्हापूरमध्ये 46 मिमी पावसाची नोंद झाली. तर सोलापूर 36.1, रत्नागिरी 7.1, सातारा 29.9 तसेच पणजीत 25.8 मिमी पाऊस नोंदविला गेला. याशिवाय अन्य काही जिल्हय़ांत शुक्रवारी दिवसभरात पाऊस नोंदविण्यात आला.
पूर्वमोसमी आला, आता मोसमी कधी?
मान्सून पूर्वीच्या पावसाला मान्सूनपूर्व किंवा पूर्वमोसमी पाऊस, असे संबोधले जाते. अंदमानात मान्सूनचे लवकर आगमन झाल्यानंतर पूर्वमोसमी पावसानेही चांगलाच दणका द्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. कोल्हापूर, सांगली, बेळगावपासून ते सातारा, सोलापूरपर्यंत दमदार हजेरी लावत पावसाने आपला तडाखा दाखवून दिला आहे. येत्या 27 मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात तो 2 जूनच्या आसपास दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मान्सूनच्या धारा नेमक्या कधी बरसणार, याविषयी उत्सुकता आहे.
मान्सून दाखल होण्याचे निकष…
दोन दिवस सातत्याने होणारा पाऊस, नैत्य दिशेकडून ताशी 20 किमीपेक्षा अधिक वेगाने वाहणारे वारे, समुद्र सपाटीपासून 2 ते 4 किमीपर्यंतची वाऱयांची उंची, आर्द्रतेत वाढ होऊन कमी उंचीवरील ढगांची निर्मिती होणे, हे मान्सूनचे प्रमुख निकष मानले जातात. या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच त्या ठिकाणी पडणारा पाऊस हा मान्सूनच असल्याचे जाहीर केले जाते.









