वृत्तसंस्था/ बेंगळूर
कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर येथे सुरू असलेल्या महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या स्पर्धेत मानांकनात चौथ्या स्थानावरील अंकिता रैनाने बोस्नियाच्या दिया हर्डझेलासचा 6-1, 6-7(7-9), 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या ऋतुजा भोसलेने आठव्या मानांकित ब्रिटनच्या इडेन सिल्वाचे आव्हान 3-6, 7-6(7-5), 6-4 असे संपुष्टात उपांत्यफेरी गाठली. त्याचप्रमाणे झेक प्रजासत्ताकच्या टॉप सिडेड ब्रेंडा फ्रुव्हर्टोव्हाने उपांत्य फेरी गाठताना इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित न्यूग्रोचा 6-0, 7-5 तसेच पाचव्या मानांकित डेलीला जेकुपोव्हिकने जपानच्या इकुमी यामाझेकीचा 6-2, 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत महिला दुहेरीत ऋतुजा भोसले आणि तिची स्वीडनची साथीदार अवाद यांनी उपांत्य फेरी गाठताना पोर्तुगालच्या फ्रान्सिस्का आणि मॅटेलडीचा 6-2, 3-6, 8-10 अशा सेट्समध्ये पराभव केला.