पुणे / प्रतिनिधी :
राज्यात पावसाने पुनरागमन केले असून, शनिवारी अनेक भागांत दमदार पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यभर वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती असून, याचे रविवारी कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. याबरोबरच विदर्भ ते दक्षिण कर्नाटकपर्यंत ट्रफ पसरला आहे. उत्तर कर्नाटकच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती, कॉमेरुन व लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती, उत्तर तामिळनाडूच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे पुढील दोन दिवस दक्षिण, पूर्व तसेच पूर्वोत्तर भारताच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यभर पावसाची हजेरी
राज्यात बऱ्याच मोठय़ा खंडानंतर पाऊस परतला असून, त्याने सर्वदूर हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या पाणीसाठय़ातही वाढ होत आहे.