इशान किशनचे सलग चौथे अर्धशतक : हार्दिकची शानदार अर्धशतकी खेळी : रोहित-विराट-गिल अपयशी
वृत्तसंस्था/ पल्लीकेले (श्रीलंका)
भारत आणि पाक यांच्यातील सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी हा सामना रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही संघांना या सामन्यात प्रत्येकी 1 गुण मिळाला असून पाकने या स्पर्धेत सुपर फोर फेरीत प्रवेश केला आहे. भारताला एकमेव गुण मिळाला असून त्यांना सुपर फोर फेरी गाठण्यासाठी पुढील सामना जिंकावा लागेल.
हार्दिक पंड्या (87) व इशान किशन (82) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचे आव्हान दिले आहे. सुरुवातीला सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हार्दिक-इशानने शानदार खेळी साकारत संघाला संकटातून बाहेर काढले, पण टीम इंडियाला 50 षटकेही खेळता आली नाहीत. 48.5 षटकांत 266 धावांवर भारताचा डाव आटोपला. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 4 तर हॅरिस रौफ व नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
प्रारंभी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. पाचवे षटक सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शाहीन आफ्रिदीने रोहितला त्रिफाळाचीत बाद करत भारता मोठा धक्का दिला. पहिल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरणार त्याआधीच शाहीनने दुसरा धक्का दिला. आफ्रिदीने विराट कोहलीलाही त्रिफाळाचीत केले. रोहितने 2 चौकारासह 11 तर विराटने 1 चौकारासह 4 धावा केल्या. रोहित आणि विराट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने डावाची सुत्रे हातात घेतली. अय्यरने दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. अय्यर आणि गिल भारताचा डाव सावरतील, असे वाटत होते. पण हॅरिस रौफने श्रेयस अय्यरला फखर झमानकरवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. अय्यरने 9 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 14 धावांचे योगदान दिले. गिल 10 धावांवर बाद झाला. भारताने 66 धावांत चार आघाडीचे फलंदाज गमावले होते.
इशान-हार्दिकची शतकी भागीदारी
आघाडीचे 4 फलंदाज तंबूत परतल्यानंतर हार्दिक पंड्या आणि इशान किशनने डाव सावरला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 141 चेंडूत 138 धावांची महत्त्वाची भागिदारी केली. एकेरी-दुहेरी धावांवर भर देत या जोडीने भारताचे द्विशतक फलकावर लावले. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच इशानला रौफने बाद केले. त्याने 81 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह 82 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. इशान बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने जडेजासोबत 35 धावांची भागिदारी साकारली. हार्दिकने 90 चेंडूत 87 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. हार्दिक बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूरही लागोपाठ बाद झाले. रविंद्र जडेजा 14 तर शार्दूल 3 धावा केल्या. कुलदीप 4 धावा काढून बाद झाला. बुमराहने 3 चौकारासह 16 धावा करत संघाला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. बुमराह बाद झाल्यानंतर भारताचा डाव 48.5 षटकांत 266 धावांवर संपुष्टात आला.
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकांत 35 धावा देत 4 बळी घेतले. नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी 3 विकेट मिळाले.
इशानचे वनडे सलग चौथे अर्धशतक

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशानने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. इशानला वनडेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकविरुद्ध त्याने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 82 धावा फटकावल्या. या खेळीसह तो वनडेमध्ये सलग चार अर्धशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. वनडेमध्ये सलग चार अर्धशतके झळकावणारा इशान किशन एमएस धोनीनंतरचा दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने 2011 साली इंग्लंडविरुद्ध सलग चार अर्धशतके झळकावली होती. मागील महिन्यात विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत सलग तीन सामन्यात इशानने अर्धशतके झळकावली होती.
हॅरिस रौफने तोडली श्रेयस अय्यरची बॅट

प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरने गिलसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, अय्यरने पाकचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला कव्हरच्या दिशेने चौकारही मारला पण यावेळी त्याची बॅट तुटली. यानंतर श्रेयसला लगेच बॅट बदलावी लागली. हॅरिस रौफ सामन्याचे आठवे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात तो 147 ते 148 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करत होता. याच षटकातील चौथा चेंडू रौफने 147 किमी प्रती तास वेगाने टाकला. अय्यरनेही हा चेंडू चांगल्या प्रकारे कव्हर ड्राईव्ह मारला. या दरम्यान त्याची बॅट तुटली. मात्र चेंडूचा वेग आणि अय्यरचा चांगला फटका यामुळे चेंडू सीमापार गेला. मात्र अय्यरला आपली बॅट बदलावी लागली. या बदलेल्या बॅटने शेवटच्या चेंडूवरही अय्यरने रौफला चौकार लगावला. यानंतर रौफने आपल्या पुढच्या 10 व्या षटकात मात्र अय्यरचा बदला घेतला. त्याने 9 चेंडूत 14 धावा करणाऱ्या अय्यरला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.
संक्षिप्त धावफलक : भारत 48.5 षटकांत सर्वबाद 266 (रोहित शर्मा 11, शुबमन गिल 10, विराट कोहली 4, श्रेयस अय्यर 14, इशान किशन 82, हार्दिक पंड्या 87, जडेजा 14, बुमराह 16, आफ्रिदी 35 धावांत 4, हॅरिस रौफ व नसीम शाह प्रत्येकी तीन बळी)









