मान्सून अजून रत्नागिरीतच रखडल्याने यंदा उशीर झाला तरीही आता पावसाला सुरुवात होईल. अधिकचा नाही पण सरासरी गाठेल असे तज्ञ सांगत आहेत. आता सलग आठ दिवस पाऊस झाल्यावरच पेरणी करा हे सरकारने सांगण्याची गरज आहे.
मान्सून लांबला असल्याने सगळ्या यंत्रणा हतबलतेचा अनुभव घेत आहेत. शेतकऱ्याला तर पेरणीची घाई झाली आहे. पाऊस पडला तर लगेच जोखीम घ्यायला त्यांची तयारी आहे. पण, हे धोकादायक आहे. म्हणावा तसा पाऊस नाही. तो सलग आठ दिवस बरसत राहिला तर पेरण्या घेणे फायद्याचे ठरेल. हे सरकारने तातडीने सांगायची वेळ आली आहे. कारण, येत्या एक-दोन दिवसात पावसाला सुरुवात होईल. मग कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत राहत नाहीत. आज राज्यभरातील धरण-तलावातील पाणी मृतसंचय साठ्याकडे वाटचाल करू लागले आहेत. रोज राज्यातील एखाद्या धरणाचे आणि तलावाचे कोरडे पडलेले छायाचित्र आणि व्हिडिओ समाज माध्यमावरून पुढे येतात आणि लोक हळहळतात. कोयना धरणात पाणीसाठा कमी झाल्याने त्याचा परिणाम वीज निर्मितीवर सुद्धा होणार आहे. पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे. गरजेपुरते पाणी जपून वापरण्याचे आवाहन होऊ लागले आहे. तज्ञ आणि हवामान विभागाच्याही अंदाजानुसार शनिवारपासून पावसाला सुरुवात होईल. रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून अद्यापपर्यंत तेथेच अडकून पडला आहे. वातावरणात आर्द्रता वाढली आहे. पश्चिमी वाऱ्यांनाही लवकरच बळ मिळणार अशी स्थिती आहे. मान्सून पुणे आणि मुंबईत लवकरच धडक मारेल. त्यानंतर राज्यात जोर धरेल अशी आशा आहे. मान्सूनची पूर्व शाखा सक्रिय असून, गुरुवारी तिने तेलंगणा, संपूर्ण आंध्र प्रदेश, ओरिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारचा काही भाग व्यापला. येत्या दोन दिवसांत मान्सून ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशपर्यंत धडक मारेल, अशी शक्यता आहे. यामुळे तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड, बिहार, विदर्भात पसरलेली उष्णतेची लाट ओसरून कमाल तापमान घटेल. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवस, तर त्यानंतरही मराठवाडा वगळता सर्वत्र पाऊस राहणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून पश्चिमी वाऱ्यांना बळकटी येत आहे.
एल निनोचा महाराष्ट्रावर प्रभाव पश्चिमी वाऱ्याला बळकटी आल्यामुळे मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. तरीही जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आहे. त्याचे कारण गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईत पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तसा काही पाऊस झालेला नाही. कडक उन्हाने लोक हैराण आहेत. आतापर्यंत हवामान खात्याने सावधपणे पावले टाकत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास तेवढेच प्राधान्य दिले आहे. या महिनाअखेरीस ते आपला अचूक अंदाज व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे. हवामान खात्याने यापूर्वी दर्शवलेल्या अंदाजानुसार हे एल निनोचे वर्ष आहे आणि पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात एल निनो सक्रिय होईल अशी स्थिती वर्तवली होती. एल निनोचा पावसावर प्रभाव पडत असतो. यापूर्वी बहुतांश वेळा अशा परिस्थितीत पाऊस सरासरी इतका किंवा त्याहून कमी पडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात घडले असते. मात्र अमेरिकेच्या नोआ या संस्थेच्या अंदाजानुसार पावसाळ्याच्या प्रारंभीच एल निनोचा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळेच पाऊस लांबला असल्याचे त्यांचे मत आहे. आतापर्यंत जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होईल हे आपण गृहीत धरून चाललो आहोत. तसेच घडेल असे वातावरणही दिसत आहे. मात्र नोआच्या अंदाजानंतर हवामान शास्त्र विभागाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्थात त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आपल्याला या महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावीच लागेल. ते काय भूमिका मांडतात याकडे भारतीय वित्त क्षेत्राचे आणि बरोबरीने कृषी व इतर क्षेत्रांचेही लक्ष लागले आहे.
शक्ती प्रदर्शन ज्याचे-त्याचे! पाऊस एकीकडे आपली शक्ती आणि उपद्रवमूल्य दाखवत असताना राजकारणीही आपली शक्ती दाखवू लागले आहेत. मुंबईत ठाकरे समर्थकांच्या घरावर पडलेले ईडीचे छापे आणि ठाकरे यांनी महापालिकेत जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे म्हणून एक जुलैला मोर्चा काढण्याची केलेली घोषणा म्हणजे सरकार आणि विरोधी पक्ष यांनी आपली शक्ती दाखवण्याचाच प्रयत्न आहे. ठाकरेंच्या दारातील सुरक्षा सरकारने कमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर सरकारने मात्र इन्कार केला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारीही मातोश्रीच्या दारी नेहमीचा बंदोबस्त नव्हता. मात्र ठाकरे बिहारला गेल्यामुळे हा बंदोबस्त दिसत नसावा. ते परतल्यानंतरच सगळे स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधीपक्ष नेतेपदाची शक्ती जास्त आहे की प्रदेशाध्यक्षपदाची? याचा आता खल सुरू असावा. दादांनी वर्षभर विरोधी पक्षनेतेपद सांभाळल्यानंतर आता त्यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे. त्यासाठी जयंतरावना पाच वर्षे एक महिना पूर्ण झाल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. तर मोठ्या जातीतील नेत्यांना पदे मिळणार असतील तर प्रदेशाध्यक्ष ओबीसीतील असावे अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे. एकूण जयंतरावांचे प्रदेशाध्यक्षपद घालवण्याचा नेत्यांचा मनोदय दिसतो. त्यामुळे विरोधी पक्षनेते होऊन सत्तेचा वाईटपणा कोण घेणार? प्रदेशाध्यक्ष बदलणार का? हे प्रश्न आहेत तसेच त्या सर्वांची शक्ती शरद पवारांना निर्णय घेण्यास किती उपयोगात येते किंवा भाग पाडते हे पाहायचे. कदाचित पवारांच्या शक्तीचाही त्यातून पुन्हा अनुभूती येऊ शकते.
शिवराज काटकर








