पाण्याची वाट तुंबल्याचा संशय, पालिका व शासनावर दुर्लक्षाचे आरोप
प्रतिनिधी / वास्को
मागच्या चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वास्को शहरासह काही सखल भागातील कुटुंबाना अतोनात त्रास सहन करावा लागला आहे. काही कुटुंबांच्या स्वयंपाक घरापर्यंत पाणी शिरल्याने या कुटुंबांची धांदल उडाली आहे. रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. नाल्यांच्या उपशाकडे दुर्लक्ष झाल्याने यंदा पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप लोकांकडून होत आहे.
वास्को शहर व जवळच्या काही सखल भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबुन घरादारांपर्यंत पाणी येण्याच्या व रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटना घडत असतात. मात्र, यंदा गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसाने गंभीर समस्या निर्माण केलेली आहे. बेलाबाय, ओरूले व मेस्तावाडापर्यंतच्या भागात यंदा पावसाच्या पाण्याचा फटका बऱ्याच लोकांना बसला. ओरूले व बेलाबाय व काही भागात अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले असून पाऊस ओसरत नसल्याने हे पाणी या घरांमध्ये जैसे थे आहे. त्यामुळे या लोकांची धांदल उडालेली आहे. दिवस कसे काढावे असा प्रश्न या कुटुंबांना पडलेला आहे. जेवण, आंघोळ, मुलांच्या शिक्षणाचे काय करायचे अशा चिंतेत हे कुटुंबे सापडलेली आहेत. घरांमध्ये पाणी आणि घरांबाहेर रस्त्यांवरही पाणीच पाणी असल्याने त्यांना बाहेर पडणे कठीण आणि घरात राहणेही कठीण अशी परिस्थिती ओढवलेली आहे. आजूबाजूला असलेल्या शेतजमिनी व नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याबरोबर अजगर व इतर सरपटणारे प्राणी घरात येण्याचा धोका या लोकांनी व्यक्त केला आहे. बऱ्याच वर्षांनी यंदा पावसाच्या पाण्याने काही कुटुंबांची तांराबळ उडवलेली आहे. शासकीय यंत्रणांना या समस्येवर त्वरीत उपाय काढून आम्हाला या समस्येतून मुक्त करावे अशी मागणी या लोकांनी केली आहे.
वास्को शहरातही काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. विशेषत: स्वतंत्रपथावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी भरत आहे. यंदा हॉटेल तानियासमोरील रेल्वे उड्डाण पुलाखालीही पाणी भरले. या समस्येचा वाहतुकीबरोबरच, पादचाऱ्यांना व वाहने पार्किंगसाठी त्रास होत आहे.
पाणी साठण्याच्या जागा व नाला तुंबल्याचा लोकांना संशय
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसात यंदा वास्को व परिसरात विशेष पडझड किंवा नुकसानीच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र, घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिसरात पाणी तुंबुन संपूर्ण घरात पाणी भरत असल्याने आपल्या घरांचे भवितव्य काय असाही प्रश्न लोकांना पडलेला आहे. यंदा अशा प्रकारची समस्या वाढल्याने लोकांकडून पालिका व शासकीय अधिकाऱ्यांना दोष दिला जात आहे. पावसाळी पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा व्हायला हवा यासाठी नाले व गटार तसेच पाणी ज्या ठिकाणी साठून राहते अशा जागांची सफाई झालेली नाही. या कामांकडे दुर्लक्ष झाल्यानेच काही ठिकाणी पाणी अडून राहिलेले असावे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पाणी कुठे अडून राहते याचा शोध घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. वास्कोतील एक प्रमुख पोर्तुगीजकालीन नाला बायणा बुटेभाटपासून मेस्तावाडा बेलाबाय, ओरूले, मायमोळे, मुंडवेल वाडे ते गोवा शिपयार्डमार्गे समुद्रापर्यंत जातो. त्यामुळे वास्कोतील अर्ध्या अधिक भागातील पावसाचे पाणी या नाल्याद्वारे समुद्राला मिळत असते. यंदा या वाटेत कुठे तरी अडथळा निर्माण झालेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मायमोळे भागात रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचेही काम चालू असून पावसाळी पाणी वाहून जाणारा नालाही याच ठिकाणी असल्याने या कामावर नजर ठेवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पालिकेकडून मान्सूनपूर्व सफाई कामात हलगर्जीपणा
मुरगाव पालिकेकडून यंदा मान्सूनपूर्व सफाईच्या कामात बऱ्याच प्रमाणात हलगर्जीपणा झालेला आहे. मागच्या काही वर्षांपासून थोड्याफार प्रमाणात असाच प्रकार सुरू आहे. पालिका क्षेत्रातील आणि प्रामुख्याने शहरातील गटारांच्या सफाईकडेही दुर्लक्ष झालेले असून याचा फटका सर्वांनाच बसत आहे. शेवटच्या क्षणी पालिकेने आपल्याच काही मजुरांच्या साहाय्याने सफाईची कामे हाती घेतली होती. त्यामुळे मोजक्याच ठिकाणी गटारांची सफाई झालेली आहे. पूर्वी मुरगाव पालिका मान्सूनपूर्व कामांसाठी ठेकेदाराची नेमणूक करीत असे किंवा स्वत:च हंगामी मजुरांना कामाला जुंपून घेत होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे पालिकेला सफाईची कामे उरकणेही कठीण ठरत असल्याचे बोलले जात आहे.









