अभयारण्यातील पूर्ण जोमाने कोसळणाऱया ‘सावरी’, ‘मैनापी’ धबधब्यांचे खास आकर्षण, सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची गर्दी
प्रसाद तिळवे /सांगे
गेल्या काही दिवसांपासून नित्य जोरदार पाऊस पडत असल्याने निसर्गसौंदर्याचा सुंदर आविष्कार घडविणाऱया नेत्रावळीत सध्या वर्षा पर्यटनाला बहर आला आहे. नेत्रावळी अभयारण्यातील प्रसिद्ध ‘सावरी’ व ‘मैनापी’ धबधबे पूर्ण जोमाने कोसळू लागले आहेत. हे मनोहरी दृष्य पाहण्यासाठी देशी पर्यटकांची पावले आता या धबधब्यांच्या स्थळी वळू लागली आहेत. मात्र धबधबा पाहायचा असेल, तर 100 रु. मोजा अशी पर्यटकांवर पाळी आलेली आहे. विकएंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात पर्यटक धबधब्यांना भेटी देत आहेत.
बराच काळ कोरोना महामारीमुळे प्रवेशबंदी असल्याने मध्यंतरी धबधबे निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे वन खात्याला प्रवेश तसेच वाहन, कॅमेरा फीपोटी मिळणारा महसूल बुडाला होता. तसेच नेत्रावळी येथील लोकांचा व्यवसाय थंडावला होता. 9 ऑगस्ट, 2021 पासून पर्यटकांना प्रवेश देण्यात आला असून आजपर्यंत वन खात्याच्या तिजोरीत त्यातून लाखो रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. सावरी धबधब्यावर सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत प्रवेश दिला जातो. डोळय़ांचे पारणे फेडणारे हे धबधबे सध्या आकर्षण बनले आहेत. एकूणच कोरोना महामारीमुळे नेत्रावळीतील बंद असलेला ‘इको टुरिझम’ खऱया अर्थाने खुला झाला आहे. मात्र भरपूर फी वाढविल्याने पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
नेत्रावळी परिसरात अनेक धबधबे
तरुणाईसाठी धबधब्यांचे आकर्षण जास्तच असते. भर पावसात ओलेचिंब होऊन आनंद लुटणे, मौजमजा करणे याला त्यांचे प्राधान्य असते. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नेत्रावळी परिसरात प्रसिद्ध सावरी धबधब्यासह तुडवचा मैनापी धबधबा, तुडव गावातील उदेंगी धबधबा, पालीचा धबधबा यासह वेर्ले ते साळजिणी रस्त्याच्या बाजूने डोंगरमाथ्यावरून पावसाळय़ात कोसळणारे असंख्य लहान धबधबे असून ते पर्यटकांचे मन प्रसन्न करून सोडतात.
नेत्रावळीत ‘इको टुरिझम’ आणि साहसी पर्यटनाला खूप वाव आहे. मात्र वनखाते व नेत्रावळी अभयारण्य विभागाने त्यादृष्टीने विकास करण्याची गरज आहे. सावरी आणि मैनापी धबधब्यांकडे जाण्यासाठी वनखाते पर्यटकांकडून फी आकारते, पण येथे बऱयाच सुविधांची वानवा आहे. सावरी धबधब्याकडे वेर्ले रस्त्याच्या बाजूने वाहने पार्क करून माट्टोनी येथून जो मातीचा रस्ता आला आहे तेथून पुढे जाता येते. या ठिकाणी वृद्ध, महिला, लहान मुले यांनाही सहज जाता येते. पावसाळा सुरू झाला की, मोठय़ा प्रमाणावर निसर्गप्रेमींची पावले सावरी धबधब्याकडे वळतात. तर उन्हाळय़ात विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात सावरी, मैनापी, पाली या धबधब्यांना भेट देतात.
सावरी धबधबा प्रसिद्ध
सावरी धबधबा खूप प्रसिद्ध झाला आहे. सुमारे 60 फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा सध्या पाहण्यास खूप मजा येते. कोसळणारे पांढरेशुभ्र, थंडगार पाणी अंगावर शहारे आणते. सावरी व मैनापी धबधब्यांकडे जाणाऱया पर्यटकांकडून वनखाते प्रवेश, वाहन, कॅमेरा आदी शुल्क आकारते. नेत्रावळीतील माट्टोनी येथील वन खात्याचे प्रवेशद्वार ते सावरी धबधबा हे अंतर 3.5 किलोमीटर इतके आहे. नेत्रावळी वन्यजीव विभागाने पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून 250 दगडी पायऱया सावरी धबधब्याच्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. शिवाय जीवरक्षक तैनात केले आहेत. सावरी धबधब्याच्या वरच्या बाजूस श्री नासादेव मंदिर असून ते धबधब्यातून येणाऱया पाण्याचे रक्षण करते अशी गावकऱयांची श्रद्धा आहे.
साहसी पर्यटकांचा मैनापीकडे कल
सावरीसह मैनापी आणि उदेंगी हे धबधबे बारमाही कोसळतात. मैनापी हा धबधबा तुडव येथे जंगलात आहे. सुमारे 14 किलोमीटर नेत्रावळीहून पदभ्रमण करत धबधब्याकडे पोहोचता येते. पावसाळय़ात हे जिकिरीचे ठरते. त्यामुळे साहसी पर्यटक व तरुणाईचा कल येथे येण्याकडे जास्त असतो. सध्या नेत्रावळीतील सर्व धबधबे प्रवाहित झालेले आहेत. तुडव येथील गावातच असलेला उदेंगी धबधबा वयोवृद्ध आणि मुलांसाठी योग्य आहे. पालीचा धबधबा व मैनापी धबधबा गिर्यारोहक, पदभ्रमणप्रेमींसाठी उपयुक्त आहेत. गोवाभरातील गिर्यारोहक पावसाळय़ात पाली, मैनापीला अधिक पसंती देतात. धबधब्यांसह नेत्रावळी येथील प्रसिद्ध बुडबुड तळी व श्री गोपीनाथाचे देऊळ, पुरातन दत्तगुंफा व तेथील श्री दत्तमंदिर, हिल स्टेशन म्हणून ओळखली जाणारी वेर्ले आणि साळजिणी ही गावे, मसाल्याच्या बागा, पोफळीच्या बागायती या वर्षा पर्यटनात भर घालत आहेत. तसा उर्वरित गोव्यापेक्षा पाऊसही येथे जास्त पडतो.
शुल्कात भरमसाठ वाढ
सध्या सावरी आणि मैनापी धबधबे तसेच अभयारण्याला भेटी देण्यासाठीच्या प्रवेश फीसह विविध प्रकारचे शुल्क भरमसाठ आकारले जाते. हा वाढीव दर 1 जानेवारी, 2021 पासून लागू करण्यात आला आहे. नेत्रावळी अभयारण्यात हे धबधबे येत असून येथे प्लास्टिक नेण्यास बंदी आहे. त्यासंदर्भातील नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.









