विशेष प्रतिनिधी/ पणजी
सध्या गोव्यात पडत असलेला पाऊस कमी होण्याची चिन्हे नाहीत, पण तो पुढील काही दिवस सातत्याने पडत राहाणार आहे. शनिवारी म्हापसा येथे पाऊण इंच तर सांखळी येथे पुन्हा अर्धा इंचापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडला.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून पावसाळी ढग मोठ्या प्रमाणात पश्चिम दिशेने सरकत आहेत. त्यातून कर्नाटकाबरोबरच गोव्यातील विविध भागांमध्ये गेले तीन दिवस दुपारनंतर जोरदार पाऊस पडतोय. शनिवारी देखील सत्तरीत जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर सांखळी, आमोणे, माशेल या भागातही जोरदार पाऊस पडला. तसेच काणकोण, सांगे, केपे व मडगावमध्ये पावसाने हजेरी लावली. केपेमध्ये शुक्रवारी अर्धा इंच, सांगेमध्येही अर्धा इंच, फोंडा, वाळपई आणि पणजीमध्ये तुरळक पावसाच्या सरी पडून गेल्या.
हवामान खात्याने आज रविवारी पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही मात्र वादळी वाऱ्याचा वेग ताशी 55 किमीच्या वेगाने राहील, असा इशारा दिला आहे.









