पहिल्याच पावसाने बेळगावकर सुखावले
बेळगाव : गरिबांचे महाबळेश्वर म्हणून नावलौकिक असलेले बेळगाव मागील महिनाभरापासून वाढत्या उन्हामुळे तापत होते. यामुळे केव्हा एकदा पाऊस येईल आणि वातावरण थंड होईल, याची प्रत्येकाला आस होती. मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाच्या तुरळक सरी शहर तसेच उपनगरांमध्ये कोसळल्या. यामुळे वातावरणात काहीसा थंडावा जाणवला. एरव्ही थंड असणारे बेळगाव सध्या चांगलेच तापत होते. दुपारच्यावेळी तर तब्बल 40 अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढले होते. यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. वाढत्या उष्म्यामुळे फॅन, कूलर, एसीशिवाय रात्री झोपणेही अशक्य होते. दोन दिवसांपूर्वी शेजारील चंदगड तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे बेळगावमध्ये लवकरच पाऊस दाखल होण्याची शक्यता होती. मंगळवारी दुपारनंतर वादळी वाऱ्याचे आगमन झाले. ढगाळ वातावरण असल्याने केव्हाही पाऊस होईल अशी शक्यता होती. सायंकाळी 5 च्या सुमारास शहरात अवकाळी पावसाच्या सरी दाखल झाल्या. काही भागात केवळ पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर काही भागात दमदार पाऊस झाल्याचे दिसून आले.
व्यापाऱ्यांची उडाली धांदल
मंगळवारी गणपत गल्ली, मारुती गल्ली येथील मध्यवर्ती बाजारपेठेत दुकाने बंद असल्याने रस्त्यावरील बाजार भरला होता. परंतु रमजानमुळे खडेबाजार परिसरात मात्र गर्दी होती. अचानक दाखल झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना सर्व साहित्य झाकून ठेवावे लागले. साहित्य भिजून नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांची तारेवरची कसरत सुरू होती. काही भागात विजांच्या कडकडाटासह सरी कोसळल्या. यामुळे काहीकाळ वीजपुरवठाही ठप्प होता.
गणेशपूर-बेनकनहळ्ळी परिसरात धुवाधार पाऊस
शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी उपनगरांसह ग्रामीण भागात अधिक होते. बेनकनहळ्ळी, गणेशपूर, हिंडलगा या परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे शिवमनगर ते बेनकनहळ्ळी ब्रिजपर्यंत गुडघाभर पावसाचे पाणी साचले होते. नागरिकांना दुचाकीसह चारचाकी पावसाच्या पाण्यातून बाहेर काढाव्या लागल्या. यामुळे बराचवेळ गणेशपूर परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.









