वातावरणात गारठा : पावसाची रिपरिप, शेतकरी भात रोप लागवडीत व्यस्त
बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा हजेरी लावली. रविवारी रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. त्याचबरोबर सोमवारी दुपारनंतर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या शेतकरी भातरोप लागवड करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मध्यंतरी उकाड्यात वाढ झाली होती. मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. आर्द्रा नक्षत्रानंतर सध्या पुनर्वसु नक्षत्र सुरू आहे. आर्द्रा नक्षत्रानेदेखील सुरुवातीपासूनच झोडपून काढल्याने जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. मान्सूनपूर्व पावसाने चांगल्याप्रकारे हजेरी लावल्याने आधीच जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.
बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीलादेखील पूर आला होता. त्यामुळे नदीकाठची शेती पुराच्या पाण्याखाली गेली होती. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातूनदेखील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मार्कंडेय नदीला पुन्हा पुराचा धोका होता. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले होते. बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतात पेरणी करण्यात आलेल्या भातपिकांचे नुकसान झाले आहे. पिके कुजून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी संधी साधली. बटाटा पिकाला भरती मारण्यासह भातपिकांमध्ये कोळपणीची कामे बहुतांश शेतकऱ्यांनी उरकून घेतली. रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र सायंकाळी हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सोमवारीही दुपारनंतर पावसाने शहराला झोडपून काढले.









