सातारा :
आधीच यावर्षी सलग पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या काही टक्केच झाल्या होत्या. त्यात सुरु असलेला पाऊस नुकताच कुठे आठ दिवसांपासून उघडला होता. तोच पुन्हा मंगळवारी दुपारपासून सातारा शहर व परिसरात मेघगर्जना करत सुरु झाला. त्यामुळे आलेली पिकेही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. सातारा जिह्यात मंगळवारी सकाळी 10 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी दिवसभरात 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अवकाळीबरोबरच जोडून मान्सून पाऊस सुरु झाला होता. त्या पावसाने शेतकऱ्यांची पेरणी रखडली. ज्या शेतकऱ्यांनी चलाखी केली त्यांचेही उगवून येण्याची भीती निर्माण झाली तरीही पेरलेले काहीसे उगवून आले. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने उघडीप दिल्याने शेतात भांगलण व इतर कामांना वेग आलेला आहे. असे असतानाच पुन्हा मंगळवारी दुपारी पावसाने सुरुवात केली आहे. दुपारी एकपासून पावसास शहर व तालुक्यात प्रारंभ झाला. नंतर हा पाऊस वाढत गेला. गेले चार दिवस उघडीप असल्याने अचानक आलेल्या पावसाने लोकांची गैरसोय झाली. हा पाऊस मेघगर्जना करत आला. त्यामुळे काहीशी तारांबळ झाली. आलेल्या पावसामुळे शेती पिकांना हानी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सातारा जिह्यात सोमवारी दिवसभर झालेला पाऊस सातारा 0.2 मिमी, जावली 0.4 मिमी, पाटण 0.0 मिमी, कराड 0.5 मिमी, कोरेगाव 0.1 मिमी, खटाव 1.4 मिमी, माण 2.4 मिमी, फलटण 0.0 मिमी, खंडाळा 0.0 मिमी, वाई 0.0 मिमी, महाबळेश्वर 0.7 मिमी अशी एकूण जिह्यात 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.








