ऐन गणेशचतुर्थीत जोरदार पावसाचा इशारा
पणजी : गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात तुरळक पावसाच्या सरी पडून गेल्या आणि केवळ अर्धा सें.मी. एवढाच पाऊस नोंदविला. तथापि, यंदाच्या मोसमात पावसाने इंचाचे शतक गाठले. पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. गोव्यात पावसाने इंचाचे शतक पार केले. गेल्या 24 तासांत केवळ 7 मि.मी. एवढी सरासरी नोंद झाली. सर्वाधिक 1 इंच पाऊस केपे आणि धारबांदोडा येथे नोंदविला गेला. इतर ठिकाणी केवळ अर्धा सें.मी. एवढाच पाऊस पडला मात्र या अर्धा सें.मी. पावसाने यंदाच्या मोसमातील पावसाचे इंचाचे शतक पार केले. सोमवारी पावसाचा जोर ओसरला मात्र ढगाळ हवामान राहिले. आज मात्र सर्वत्र मध्यम तथा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. ऐन गणेश चतुर्थी काळात गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बुधवार व गुरुवारपर्यंत पावसाचा हा अंदाज असून त्यानंतर पावसाचे प्रमाण मर्यादित राहील. दरम्यान, सध्या जरी इंचाचे शतक पार केले असले तरी सरासरी 2 टक्के पाऊस कमीच आहे.
सर्वाधिक पाऊस धारबांदोड्यात
यंदाच्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक 133 इंच पाऊस धारबांदोड्यात पडलेला आहे. सांगे येथे 130.50 इंच पडलेला आहे. केपे येथे 123.50 इंच, वाळपई येथे 131 इंच पाऊस पडला. फोंडा 105.70 इंच, सांखळी 102 इंच, पेडणे व काणकोण येथे प्रत्येकी 96 इंच पावसाची नोंद झालेली आहे. पणजीत मात्र आतापर्यंत 83 इंच पाऊस पडलेला आहे.









